शुक्रवार, २४ जुलै, २०१५

रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यांवर वाहतुकीची चिन्हे व गतिरोधके बसवा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


धुळे, दि. 24 :- जिल्ह्यात रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित  ठेवणे आवश्यक आहे. रस्ता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर, शहरातील रस्त्यांवर वाहतुकीची चिन्हे, वेग मर्यादा फलक आवश्यक तेथे गतिरोधके संबंधित यंत्रणांनी 15 दिवसाच्या आंत बसवावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज दिल्या.
            गतिरोधक समिती व रस्ता सुरक्षा उपाययोजना समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, महानगरपालिका उपआयुक्त     डॉ. प्रदीप पठारे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, मनपाचे अभियंता कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. भदाणे, उप अभियंता एस.डी. सूर्यवंशी,  राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 चे  प्रकल्प संचालक  एम. के. वाठोरे,  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  एन. आर. जगदाळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सी. डी. थवील, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक  अशोक देवरे आदि उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, गतिरोधक समिती व रस्ता सुरक्षा करावयाच्या उपाय योजना समितीच्या दि. 10 मार्च, 2015 रोजी झालेल्या सभेतील विषयानुसार  राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर, सुरत-धुळे रस्ता, पारोळा रोड, शिवाजी पुतळा चौक,  धुळे मनपा हद्दीतील जिल्हा न्यायालय समोरील स्टेशनरोड, चाळीसगाव रोड, 80 फुटीरोड चौफुली आदि रस्त्यांवर गतिरोधके बसविण्याची, वाहतुकीची चिन्हे, वेगमर्यादा फलक लावण्याची कार्यवाही करावी.  जेणेकरून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल.  त्यामुळे वाहन चालकांना वाहनांचा वेग नियंत्रीत करणे सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
            उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची, पार्कींग लॉटस करण्यासाठी समितीच्या अहवालाची माहिती  यावेळी दिली.
0000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा