शुक्रवार, २४ जुलै, २०१५

शहरात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी हॉकर्स, पार्कींग, वाहतूक सिग्नल व्यवस्थेसाठी समन्वय साधावा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 24 :- शहरात रस्त्यावरील वाहतूक  सुरक्षित ठेवणे  आवश्यक आहे.  शहरातील  वाहतुकीची कोंडी होणार नाही याकरिता पोलीस, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागांनी  हॉकर्स, सार्वजनिक पार्कींग तसेच वाहतूक सिग्नल आदींची व्यवस्था समन्वयाने करण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात धुळे शहरातील वाहतूक समस्या बाबतची बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी  पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे,  उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे(धुळे) राहूल पाटील (शिरपूर), महानगरपालिका उपआयुक्त  डॉ. प्रदीप पठारे, मनपाचे अभियंता कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. भदाणे, नगररचनाकार एस. बी. विसपुते, उप अभियंता एस.डी. सूर्यवंशी,  राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 चे  प्रकल्प संचालक  एम.के. वाठोरे,  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  एन. आर. जगदाळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सी. डी. थवील, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक  अशोक देवरे आदि उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, महानगरपालिकेने स्थानिक हॉकर्सच्या मागणीनुसार शहरातील विविध भागांमध्ये महानगरपालिकेच्या असलेल्या जागांवर त्यांची पर्यायी व्यवस्था  करून द्यावी. त्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल, असेही त्यांनी सांगितले.
            शहरातील  सार्वजनिक पार्कींग व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी म्हणाले की, शहरातील महानगरपालिका शाळा क्र. 1, देवपूर, साक्रीरोड, भारतीय स्टेट बँक  अशा भागात दुचाकी, चार चाकी वाहनांकरिता स्वतंत्र पार्कींग व्यवस्था करून त्याठिकाणी त्याबाबतचे फलक लावण्याची व्यवस्था महानगरपालिकेने करावी.  त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे.  वाहतुकीमुळे अडथळा निर्माण होणार नाही अशी अतिक्रमणे काढावीत.  शहरातील सावरकर पुतळयाजवळ असलेल्या फर्निचर दुकानदारांनी रस्त्यावर वस्तु ठेऊ नये, ठेवल्यास त्या वस्तु जप्त करण्याची कारवाई संबंधितांनी करावी. तसेच जाहिरात फलकांचा कायम आणि तात्पुरत्या स्वरूपाचा आराखडा महानगरपालिकेने त्वरित करावा.
            पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील म्हणाले की, शहरातील आग्रा रोड, संतोषी माता चौक तसेच जास्त वर्दळीच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजुला पांढरे पट्टे टाकावेत.  त्यामुळे संबंधित परिसरातील दुकानदार आपल्या वस्तुंचे प्रदर्शन रस्त्यावर करणार नाहीत.  तसेच शहरातील एस. टी. बसेस थांब्याच्या डाव्या बाजुस थांबवून प्रवाशांची वाहतूक करणे आवश्यक आहे.  त्यासाठी एस. टी. महामंडळाकडून बसचालकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात.  जेणेकरून  रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहील, असेही त्यांनी सांगितले.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा