मुंबई, दि. 10 :- नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर या जिल्ह्याला आवश्यक पदे भरण्याची मागणी सातत्याने होत होती. ही रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन लिपिक संवर्गातील 151 पदे व तलाठी संवर्गातील 41 पदे असे 197 पदांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री (महसूल) संजय राठोड यांनी दिली.
गणेशोत्सव मुहुर्तावर पालघर वासियांना दिलासा द्यावा, त्यांची कामे तात्काळ व प्रभावीपणे व्हावी, यासाठी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची आग्रही भूमिका होती. त्यांच्या सहकार्यामुळे नवनिर्मित पालघर जिल्ह्यातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येत असल्याचेही श्री.राठोड यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण राज्यामध्ये तलाठी व लिपिक संवर्गीय पदांच्या भरतीचा निर्णय जुलैमध्ये घेण्यात आला होता. त्यास वित्त विभागाची मान्यता घेऊन वित्त विभागाकडून 75 टक्के रिक्त जागा भरण्याची परवानगी घेण्यात आली आहे आहे. त्यामुळे प्रस्तावित भरतीच्या जागांमध्ये 400 पदांची वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हयातील सरळसेवेतील 49 रिक्त पदे व पालघर जिल्हयातील 106 लिपिक वर्गीय पदांची भरती होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
नोंदणी विभागात एकूण 918 कनिष्ठ लिपिकांची पदे मंजूर आहेत, त्यापैकी 437 पदे रिक्त आहेत. वेतनावरील खर्च नियंत्रणाकरिता वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक 2 जून 2015 अन्वये रिक्त पदांपैकी 50 टक्के किंवा मंजूर पदांच्या 4 टक्के यापैकी जे कमी आहे तेवढेच पदे भरता येतील म्हणजेच नोंदणी विभागात केवळ 37 इतकीच पदे भरता येणार होती. तथापि, नोंदणी विभागाची वसूली ही 19,959/- कोटी इतकी आहे. 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये हे उद्दिष्ट 21,000/- कोटी एवढे आहे. ही वसूली 40 टक्के रिक्त असतांना करणे शक्य नसल्याने रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या भरतीमुळे महसूल विभागाचे रू. 6 हजार कोटींची वसुली व नोंदणी विभागामार्फत होणारी रू.21 हजार कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट येत्या आर्थिक वर्षामध्ये साध्य केले जाणार आहे. महसूल विभागाच्या या प्रस्तावास मान्यता घेऊन 327 कनिष्ठ लिपिकांची पदे भरण्याचा निर्णय सामान्य नागरिकांना दिलासा देणारा असल्याचेही महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा