उस्मानाबाद,दि.4: राज्य शासनाचे जलसंधारणांच्या
कामांना प्राधान्य असून ज्या गावांचा जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढता आहे, त्या
गावातील कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उस्मानाबाद तालुक्यातील
विविध गावांतील जलयुक्त शिवार अभियानातील विविध कामांची तसेच ढोकी शिवारातील नाला खोलीकरणाच्या
कामाची पाहणी केली. त्यानंतर जलयुक्तच्या कामांची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी जिल्हा
परिषद अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार सर्वश्री
मधुकरराव चव्हाण, राणा जगजीतसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद
म्हैसकर, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ.
प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा पोलीस अधिक्षक
अभिषेक त्रिमुखे, जि.प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड यांच्यासह पाटबंधारे,
जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात अतिशय चांगले काम सुरु असून हा वेग वाढविण्याची
गरज आहे. त्यासाठी लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे. ज्या
गावात लोकसहभाग वाढता राहील, तेथे राज्य शासनही जलयुक्तच्या कामांना
निधी कमी पडू देणार नसल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आता शेतकऱ्यांचीखरीप हंगामाची कामे सुरु झाली आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना
पीककर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर फौजदारी कार्यवाही केली जाईल, असे
त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिरता देणे,
त्यांच्या सातबाऱ्यावरील पीककर्जाचा बोजा कमी करणे यासाठी पहिल्या वर्षी
शून्य टक्के दराने तर पुढील चार वर्षे सहा टक्के दराने कर्ज दिले जाईल. सहा टक्केंचा जादा भार राज्य शासन उचलेल, असेही त्यांनी
स्पष्ट केले. टंचाईमुक्त महाराष्ट्र हे आमचे ध्येय असून त्यासाठी
प्रत्येक गावांत लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून परिवर्तन आणू,
असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यानंतर तेर (ता. उस्मानाबाद येथील ) तेरणा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीच्या
बंधाऱ्यावरील स्वयंचलित गेटची (सयांत्रिक द्वार उच्चालन)
पाहणी केली. हे गेट गिअरद्वारे खाली वर करता येत असल्याने मजुरी आणि देखभालीचा खर्च वाचणार
आहे. तसेच कायम पाणीसाठा
राहिल्याने त्याचाही लाभ होणार आहे. परिसरातील सिंचनक्षेत्रात
वाढ होऊन आसपासच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ
अधिकाऱ्यांसह या कामाची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. पाटबंधारे विभागाच्या उपसा सिंचन विभागाचे अधीक्षक
अभियंता बी.डी. तोंडे आणि कार्यकारी अभियंता
व्ही.बी. कोटेचा यांनी त्यांना या प्रकल्पाची माहिती
दिली.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा