धुळे,दि. 13 :- मानव विकास कार्यक्रमाच्या
माध्यमातून तळागाळातील सामान्य व्यक्तीचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित शासकीय अधिका-यांनी मानव
विकास कार्यक्रमाअंतर्गत तालुकानिहाय निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून शिक्षण, आरोग्य व बालकल्याण तसेच
कृषि विभाग व स्वयंरोजगार प्रशिक्षण आदि उत्पन्न वाढीच्या विविध योजनांची
परिणामकारक अंमलबजावणी करुन मानव विकास कार्यक्रमासाठी दिलेले उद्दिष्ट मार्च-2012
अखेर पूर्ण करण्याच्या सूचना मानव विकास कार्यक्रमाचे आयुक्त कृष्णकांत भोगे यांनी
आज दिल्या.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या वतीने राबविण्यात येणा-या मानव
विकास कार्यक्रम-2011-2012 च्या माहे डिसेंबर-2011 अखेर झालेला खर्चाचा आढावा बैठक
आयुक्त कृष्णकांत भोगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. त्यांचेसमवेत जिल्हाधिकारी प्रकाश महाजन,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा नियोजन अधिकारी
दिनेश वाघ, प्रांत टी. डी. हुलवळे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. राहूल चौधरी,
गट विकास अधिकारी चंद्रकांत पवार (साक्री), कोल्हे (शिंदखेडा), गोपाळ पाटील (
धुळे), शिरपूर, साक्री, शिंदखेडा, धुळे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. महाले, तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
प्रकाश सांगळे, आयटीआय प्राचार्य राजपूत, सर्व तालुक्यातील आयटीआयचे प्राचार्य,
संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मानव
विकास कार्यक्रमाचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोचविण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे
सांगून आयुक्त कृष्णकांत भोंगे म्हणाले की, शिक्षणाचा विशेष उजळणी वर्ग इ.
दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 2,216 तर बारावीच्या नापास झालेल्या 489 असून
जिल्हयातील विद्यार्थ्यांची उजळणी वर्गाची तालुकानिहाय स्थिती सुधारण्याची
आवश्यकता आहे. शिक्षणाबरोबर अभ्यासिका,
बालभवन, विज्ञान केंद्र, वाहतूक सुविधांचा लाभही विद्यार्थी-विद्यार्थीनींना
त्वरित देण्यात यावा.
आयुक्त
कृष्णकांत भोगे यांनी आरोग्य व बालकल्याणअंतर्गत गर्भवती महिलांची, बालकांची व
मातांची आरोग्य तपासणी तसेच 475 किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण, बाळंत काळातील
महिलांच्या बुडीत मजुरीचा आढावा घेतला.
बुडित मजुरीची तालुकानिहाय स्थिती जाणून घेतली. बुडित मजुरीचा लाभ लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक
त्वरीत देण्याबाबत मार्गदर्शक सूचना संबंधित अधिका-यांना यावेळी केल्या.
आयुक्त
कृष्णकांत भोगे यांनी फिरते माती परिक्षण प्रयोगशाळा सुरु करणे, स्वयंसहाय्यता बचत
गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात परसबाग, भाजी पाला आदिंचा आढावा घेऊन त्याची
अंमलबजावणी कृषि विभागाने त्वरीत करावी, असे सांगितले.
व्यक्ती
विकास ही संकल्पना समोर ठेवून गरजू 1,200 विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीकल,
अटोमोबॉईल्स आदि विविध विषयावर एक महिन्याचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती
यावेळी बैठकीत देण्यात आली. यावेळी आयुक्त कृष्णकांत भोंगे यांनी या
प्रशिक्षणानंतर किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला तसेच व्यवसाय सुरु केला आहे
याबाबतची माहिती संबंधित अधिका-यांनी घेण्याच्या सूचना यावेळी केल्या.
आयुक्त कृष्णकांत भोंगे म्हणाले
की, मानव विकास कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी संबंधित अधिका-यांनी योग्य ते
नियोजन करावे. कामात कुचराई करणा-या अधिका-यांविरुध्द कार्यवाही करण्याचे
निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मानव विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी
चांगल्याप्रकारे होण्यासाठी अंमलबजावणी करणा-या अधिका-यांचा आढावा जिल्हा नियोजन
विभागामार्फत नियमीत घेण्यात यावा. जिल्हाधिकारी प्रकाश महाजन म्हणाले की,
मानव विकास कार्यक्रमातील योजनांची अंमलबजावणी करतांना संबंधित अधिका-यांना अडचणी
आल्यास त्या सोडविण्यासाठी आपण
जाणीवपूर्वक प्रयत्न करु. असे सांगितले. शेवटी
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सर्वांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा