शनिवार, १९ सप्टेंबर, २०१५

बँक ऑफ चायनाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्याचे आश्वासन मुंबईतशाखा स्थापन्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार

मुंबई, दि. 18 : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये बँक ऑफ चायनाची पहिली भारतीय शाखा सुरू झाल्यास भारत आणि चीन या देशांचे आर्थिक आणि औद्योगिक संबंध वृद्धिंगत होतील. त्यामुळे बँकेच्या स्थापनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बँक ऑफ चायनाच्या शिष्टमंडळाला दिले.
            बँक ऑफ चायना ही चीनमधील अग्रेसर बँक आहे. या बँकेच्या पर्यवेक्षकीय बोर्डचे संचालक ली जून यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्याची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिकआणि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी बँक ऑफ चायनाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना चीन भेटीचे निमंत्रणही दिले.
मेक इन महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह नुकताच चीनचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेनुसार बँक ऑफ चायना ही मुंबईमध्ये आपली शाखा सुरू करीत आहे. मुंबईसह राज्यात विविध चिनी उद्योग समुहांनी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या राज्यातील शाखेमुळे भारत-चीन आर्थिक संबंधांना अधिक चालना मिळणार आहे.

-----०००-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा