मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

पर्यावरण संरक्षणासाठी तेल आणि गॅस बचतीची गरज --डॉ. अश्विनी जोशी


मुंबई, दि. 16 : पृथ्वीवरील वातावरणात झालेला बदल लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षणासाठी तेल आणि गॅस यांची बचत करण्याची गरज असल्याचे नियंत्रक शिधावाटप तथा संचालक, नागरी पुरवठा डॉ. अश्विनी जोशी यांनी आज येथे सांगितले.
            पेट्रोलियम कॉर्पोरेशन रिसर्च ऑरगनायझेशन व सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ते 31 जानेवारी 2012 पर्यंत तेल आणि गॅस बचत पंधरवडा साजरा करण्यात येतो. या पंधरवड्याचे उद्घाटन येथील सह्याद्री अतिथीगृहात झाले त्यावेळी डॉ. जोशी बोलत होत्या. पेट्रोलियम कॉर्पोरेशन रिसर्च ऑरगनायझेशनचे संचालक  टी. बक्षी, गेलचे के. टंडन,  तसेच बी. जे. परमार, परमिंदर सिंग आदी तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, तेल कपंन्याचे वितरक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
            डॉ.जोशी म्हणाल्या की,  ग्रामीण भागामध्ये सौर ऊर्जा तसेच सोलर कुकर, बायोगॅस आदींच्या वापरा संबंधी प्रसार करुन या बाबतच्या तांत्रिक शिक्षणासाठी कार्यशाळा घेणे गरजेचे आहे.
            यावेळी उपस्थितांना तेल आणि गॅस वाचविण्याबाबतची शपथ देण्यात आली. तसेच अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. या संदेशात श्री. देशमुख म्हणतात की, भारताला परदेशातून पेट्रोलजन्य पदार्थ आयात करावे लागतात आणि याचा थेट परिणाम आपले परकीय चलन कमी होण्यावर होत असतो. त्यामुळे पेट्रोलजन्य पदार्थांची बचत करणे हे आपल्या सर्वांच्या फायद्याचे आहे आणि ऊर्जेची बचत ही आपल्या दैनंदिन जीवनाचा भागच बनला असून हा बचतीचा साठा उद्यासाठी आणि भावी पिढीसाठी फार गरजेचा आहे.
            तेल कंपन्यांच्यावतीने या पंधरवड्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप यावेळी करण्यात आले.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा