मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२

मराठी संकेतस्थळ स्पर्धेत महान्यूज सर्वप्रथम


मुंबई, दि. 18 - राज्य मराठी विकास संस्था आणि  सीडॅक मुंबई यांच्या संयुक्त सहकार्याने घेतलेल्या मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  'महान्यूज' या संकेतस्थळाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पंधरा हजार रूपये रोख व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
          या स्पर्धेतील शासकीय गटात 'महान्यूज' सर्वोत्कृष्ट ठरले. विश्वकोषाच्या (www.vishwakosh.org.in) संकेतस्थळाला द्वितीय क्रमांकाचा दहा हजार रूपयांचा, तर महाराष्ट्र शासनाच्या (www.maharashtra.gov.in) संकेतस्थळाला तृतीय क्रमांकाचा पाच हजार रूपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
          अशासकीय स्थळ स्पर्धेत मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या संकेतस्थळ स्पर्धेत लोकमतच्या (www.lokmat.com) संकेतस्थळाला प्रथम क्रमांकाचा पंधरा हजार रूपयांचा, दै. दिव्य मराठीच्या (www.divyamarathi.bhaskar.com) संकेतस्थळाला द्वितीय क्रमांकाचा दहा हजार रूपयांचा, तर जळगाव लाईव्ह (www.jalgaonlive.com) या संकेतस्थळाला तृतीय क्रमांकाचा पाच हजार रूपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
          स्पर्धेतील इतर संकेतस्थळाच्या विभागात शिवकालीन इतिहासाची माहिती देणाऱ्या www.marathidesha.com या संकेतस्थळास प्रथम, राम गणेश गडकरींच्या समग्र साहित्याची माहिती देणाऱ्या www.ramganeshgadkari.com या संकेतस्थळाला द्वितीय, तर औंध या ऐतिहासिक संस्थानाची माहिती देणाऱ्या www.aundh.info या संकेतस्थळास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
          या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नंदिनी आत्मसिध्द, मंगेश करंदीकर, अमोल सुरोशे यांनी शासकीय संकेतस्थळे आणि मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या संकेतस्थळे या गटातील संकेतस्थळांचे परीक्षण केले. तर डॉ. राजीव चिटणीस, चारूदत्त भागवत, राजेश्वरी कदम यांनी इतर संकेतस्थळ गटाचे परीक्षण केले.
          या स्पर्धेचा पारितोषिक समारंभ दि. 27 फेब्रुवारी 2012 रोजी मराठी भाषा दिनाच्या दिवशी होणार आहे. पु. ल. देशपांडे कलाअकादमी येथे होणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा