‘वृक्षवल्ली आम्हां
सोयरे वनचरेêü’ असं सांगून संत
तुकारामांनी आपल्या जीवनातील वृक्षांच महत्व अधोरेखित केले आहे. जीवनाचा श्वास आणि
जगण्याची आस देणारी हिरवीगार वनराई आपल्याला नेहमीच आकर्षित
करते. म्हणूनच माणसानं झाडांशी आपलं आगळं वेगळं नातं नेहमी जपलं आहे. याचं अनोखं
उदाहरण आपल्याला पहायला मिळते ते सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ
तालुक्यातील अनगर गावात. या गावांने वक्षांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ आणि
संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे.
सोलापूर
जिल्ह्यात मोहोळ माढा रस्त्यावर तालुका मुख्यालयापासून 12 कि.मी अंतरावर वसलेल्या
या गावाची जशी कलावंतांचे आश्रयस्थान म्हणून ओळख आहे तशीच ती वृक्षांना दत्तक
घेणारं गावं म्हणूनही. गावची लोकसंख्या
8,000. यात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतांना दिसतात.
आपला गावं सुंदर
असावा, स्वच्छ असावा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो पर्यावरण संरक्षित असावा म्हणून
या गावानं पुढाकार घेऊन ग्रामविकास विभागाच्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम
योजनेत सहभाग घेतला. ग्रामसभा, फलक, लोकनाट्य, कलापथके यासारख्या अनेक माध्यमांचा
उपयोग करीत त्यांनी या योजनेचे महत्व आणि त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचविले.
शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना योजनेत सहभागी करून घेतांना वृक्षदिंड्या
काढल्या. याचा परिणाम साहजिकच योजनेमध्ये लोकसहभाग वाढण्यात झाला. गावातील लोकांची मानसिकता बदलू लागली. ‘अरेêü, गावात प्लॅस्टिक बंदी केलीच पाहिजे. . . नाही तर पर्यावरणाचे
संरक्षण कसे होणार ? अन् आपल्याच श्वासांसाठी गावात झाडं लावाया नको ?
असं एकमेकांना विचारत लोक वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात हीरिरीने सहभागी झाले. गाव स्वच्छ असेल तर आपलं आरोग्य चांगलं
राहील ही कल्पना लोकांच्या मनात रुजू लागली. लोक जोमाने योजनेतील निकष पूर्ण
करण्याच्या कामाला लागले.
ज्या गावाला
सुरुवातीला हे आणखी एक काय नवं ? असा प्रश्न पडला होता त्याच गावाने आता योजनेचे
सगळे नियम पाळत आपली ग्रामपंचायत पर्यावरण संरक्षित समृद्ध ग्राम योजनेत सगळ्यात
पुढे कशी असेल, ती यातील निकषाला पात्र ठरून पुरस्कार कशी मिळवेल यासाठी मनापासून
प्रयत्न केले.
..2/-
वृक्षांना दत्तक घेणारं अनगर गाव.. :2:
अपुरा लोकसहभाग,
महिलांची पाण्यासाठी वणवण, वीजेचा तुटवडा, गावात झाडं नसणं यासारखं गावाचं पहिलं
चित्र या लोकांनी आपल्या इच्छाशक्तीनं पार पुसुन टाकण्याचा प्रयत्न केला. एकदा
योजनेत सहभागी व्हायचं ठरवल्यानंतर गावातील प्रत्येक व्यक्तीस दत्तक स्वरूपात
झाडांचं वाटप करण्यात आलं. एवढंच नाही तर दत्तक दिलेलं हे झाडं जिवंत राहावं,
वाढावं यासाठी या झाडांच्या दत्तक पालकांवर त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी
सोपविण्यात आली.
गावानं वैयक्तिक
बायोगॅस सुरु करून दैनंदिन उर्जेची गरज पूर्ण केली. त्याचबरोबर स्वंयस्फुर्तीने
वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम आणि त्याचा वापर सुरु केला.
गावाचा विकास
करायचा असेल, गावात विविध विकासकामे करायची असतील तर गावाची घरपट्टी-पाणीपट्टी
यासारखी कर वसुली ही थकित राहाता कामा नये, ती वसुल झाली पाहिजे हे लक्षात घेऊन या
योजनेमध्ये पहिल्यावर्षी कर वसुलीचे उद्दिष्ट 60 टक्के इतके ठेवण्यात आले होते.
परंतू गावाने पाहिल्याच वर्षी 100 टक्के करवसुली केली. लोकवर्गणीतून सोलर प्लांट आणि पाण्याची टाकी
बसवून घेतल्याने गावाची पाण्याची अडचण दूर झाली.
गावाने सांडपाणी
व्यवस्थापनासाठी कमी खर्चात बांधलेल्या
भूमिगत गटारी तर जिल्ह्यात अनगर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत.
वाड्या-वस्त्यांवर सौर पथ दिव्यांची उभारणी करण्यात आली आहे. याच्यापुढे जाऊन
गावाने सौर अभ्यासिकेची सुरुवात केली असून
योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी लावलेल्या फळ झाडांमुळे त्यांना शेती बरोबर पूरक
व्यवसायाची जोड देखील मिळाली आहे.
गावाचं हे
बदलेलं रूपडं पाहतांना आज गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद आहे. आता यापुढे
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतून पवनचक्की उभारून संपूर्ण गाव वीजेच्या
बाबतीत स्वंयपूर्ण करण्याचा गावाने निर्धार केला आहे. एकजुटीची ताकद खुप मोठी
असते. हीच ताकद गावांच्या विकासासाठी सकारात्मक पद्धतीने उपयोगात आणली तर गावाचा
चेहरामोहरा बदलायला वेळ लागत नाही हेच जणू अनगर गावच्या गावकऱ्यांनी आपल्या
कामातून दाखवून दिलं आहे.
. .
. डॉ.
सुरेखा मुळे
वरिष्ठ सहाय्यक संचालक
(माहिती)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा