मुंबई, दि. 21 : आधुनिक
महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले
मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा शुभारंभ राष्ट्रपती प्रतिभाताई
पाटील यांच्या हस्ते दि. 12 मार्च 2012 रोजी मुंबई येथे करण्यात येणार असल्याची
माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
स्व. यशवंतराव चव्हाण
यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. 13
मार्च 2012 पासून सुरु होऊन ते 12
मार्च 2013 रोजी पूर्ण होईल. या जन्मशताब्दी
वर्षात राज्य शासनामार्फत विविध योजना,
कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर करावयाच्या कार्यक्रमांची निश्चिती
करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची आज बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. जन्मशताब्दीवर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण
यांच्याशी संबंधित निवडक पुस्तकांचे संच सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याची
सुचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री
आर. आर. पाटील,
ग्रामविकास मंत्री जयंत पाटील,
वनमंत्री पतंगराव कदम,
जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर,
सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,
मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड,
आमदार उल्हास
पवार,
जन्मशताब्दी वर्षात
राबविण्यात येणाऱ्या योजना आणि कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे सदस्य गिरीश गांधी,
कलाप्पा आवाडे, राम प्रधान, आमदार शशिकांत
शिंदे यांच्यासह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे आणि वरिष्ठ
शासकीय अधिकारी उपस्थित होते.
स्व. यशवंतराव चव्हाण
जन्मशताब्दी कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा दि. 12 मार्च 2012
रोजी गेट वे ऑफ इंडिया
येथे करण्याचे प्रस्तावित आहे. सांयकाळी 6 ते 9.30
या वेळेत मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीत या मुख्य समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या तसेच वर्षभर आयोजित
करावयाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने राज्यात दर महिन्याच्या 12 तारखेला
एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल,
यामध्ये विविध विभागांचा सहभाग असेल असेही मुख्यमंत्री चव्हाण
यांनी सांगितले.
स्व. यशवंतराव चव्हाण
यांच्या जीवनकार्याचे विविध पैलू उलगडून दाखविणारे हे कार्यक्रम राज्याच्या सर्व भागात आणि नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येतील. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची
धुरा सांभाळलेल्या
यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रीय स्तरावर परराष्ट्र, गृह आणि सरंक्षण यासारखी महत्वाची खाती सांभाळली.
त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगला संपर्क
होता. त्यांनी
सहकार,
शिक्षण,
साहित्य,
ग्रामविकास,
कृषी,
औद्योगिक विकास यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. नव्या पिढीला
त्यांच्या कार्यकतृर्त्वाची माहिती
होण्यासाठी तसेच त्यांचे विचार आणि कार्य सर्वदूर पोहोचविण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात
येत असून यामध्ये होणाऱ्या परिसंवाद आणि चर्चासत्रांसाठी विभागांनी विषय आणि संकल्पना सुचवाव्यात असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
.
. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा