मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची नवी संधी - राजेश टोपे


मुंबई, दि. 18 : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची नवी संधी मिळून त्यांचा सामाजिक आर्थिक विकास करणारी  भारती वालमार्ट सोबतची प्रशिक्षण योजना ठाणे, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. त्याचा राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठया प्रमाणात लाभ होईल, असे प्रतिपादन उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केले.
            उच्च तंत्र शिक्षण विभाग भारती वालमार्ट या जागतिक स्तरांवरील मार्केटिंग कंपनी यांच्या दरम्यान एक सामंजस्य करार मंत्रालयात करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. उच्च तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार, सह सचिव जी.जे. रसाळ, भारती वालमार्टच्या वरिष्ठ उपाध्यक्षा आरती सिंग, स्मिता नायर, व्यवसाय प्रशिक्षण महासंचालनालयाचे सहसचिव एस.जे. देवडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
            श्री. टोपे म्हणाले की, राज्यातील युवकांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याची शासनाची महत्वपूर्ण योजना आहेच. या योजनेमुळे व्यवसायाच्या विविध क्षेत्रात कुशल असे मनुष्यबळ राज्यात उपलब्ध होत आहे. भारती वालमार्ट बरोबर झालेल्या या करारामुळे राज्यातील युवकांना रोजगार  मिळू केल त्यामुळे त्यांचा पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचाही   सामाजिक आर्थिक विकास  होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील तीन शहरात भारती वालमार्टची
प्रशिक्षण योजना
भारती वालमार्टची प्रशिक्षण  योजना सध्या प्रायोगिक तत्वावर ठाणे, औरंगाबाद, जालना या शहरात राबविण्यात येणार आहे. ही योजना मोफत असून प्रत्येक केंद्रावर दरमहा 125 विद्यार्थ्यांना या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल. यापूर्वी या  संस्थेमार्फत दिल्ली, अमृतसर, बेंगलोर येथे जवळपास 9500 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. विविध व्यावसायिक क्षेत्रामध्ये अथवा मॉल मध्ये ग्राहकांशी साधावयाचा संवाद तसेच मॉल मधील विविध विभागांशी निगडीत असलेली कामे इत्यादी प्रशिक्षण युवकांना देण्यात येणार आहे.
भारती वालमार्टने ही प्रशिक्षण योजना तयार केली असून  त्याचा लाभ महाराष्ट्रातील  युवकांना व्हावा यासाठी झालेल्या या करारावर भारती वालमार्टच्या वरिष्ठ उपाध्यक्षा आरती सिंग आणि व्यवसाय प्रशिक्षण महासंचालनालयाचे सहसचिव एस.जे. देवडेकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. लवकरच ही योजना  कार्यान्वित होणार आहे.
0 0 0 0 0

1 टिप्पणी: