गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर 1153 गावात हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी


मुंबई, दि. 18 : राज्यातील रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली असून त्यानुसार नाशिक विभागातील 367, औरंगाबाद विभागातील 116 आणि पुणे विभागातील 670 अशा एकूण 1153 गावांमध्ये हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. नागपूर आणि अमरावती या विभागांची पैसेवारी नंतर जाहीर होणार आहे.  राज्यात एकूण 7 जिल्ह्यांमधील 806 गावे वाड्यांमध्ये 140 टँकर्समधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
            राज्यातील टंचाई सदृश परिस्थिती, पिण्याच्या पाणी पुरवठ्याची स्थिती, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयांमधील पाण्याच्या साठ्याची स्थिती, तसेच रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
            कोकण, नाशिक, पुणे औरंगाबाद विभागातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक विभागात 1130, औरंगाबाद विभागात 23 आणि पुणे विभागात 614 मिळून एकूण 1767 गावांमधील अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. अमरावती नागपूर विभागातील अंतिम पैसेवारी लवकरच जाहीर होणार आहे. शासनाच्या स्थायी निर्देशानुसार ज्या गावांमधील अंतिम पैसेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा गावांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे रुपांतरण, वीज बिलात एक तृतियांश सूट, परीक्षा शुल्कात माफी, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती आणि बाधीत शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडि करणे आदी सवलती देण्यात येतात. 
            राज्यात पुणे नाशिक विभागातील 16 तालुक्यांमधील 1124 आणि गोंदिया जिल्ह्यातील 47 अशा एकूण 1171 गावांमध्ये टंचाई सदृश परिस्थिती यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे.  या गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करणे, टँकरने पाणी पुरविणे, चारा डेपो उघडणे आदी सवलती देण्यात आलेल्या आहेत. चारा डेपो उघडण्याचे सर्व अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि टँकरने पाणी पुरवठा करण्याचे अधिकार तहसिलदारांना देण्यात आले आहेत.
            राज्यात रोजगार हमी योजनेची एकूण 39,910 कामे सुरु असून त्यावर 4 लाख 34 हजार 304 मजूर काम करीत आहेत. राज्यातील मोठ्या, मध्यम लघुपाटबंधारे प्रकल्पातील जलाशयांच्या उपयुक्त पाणी साठ्याची स्थिती समाधानकारक असल्याची माहिती मंत्रिमंडळाला देण्यात आली.
----0----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा