गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

प्रजासत्ताक दिनी सकाळी 9.15वाजता राज्यभर ध्वजारोहण


मुंबई, दि. 18 : 26 जानेवारी 2012 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.15 वाजता करण्यात यावा. या दिवशी राज्यात सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्हयांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत. संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपआपल्या अधिकार क्षेत्रात प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
            जास्तीत जास्त व्यक्तींना या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे याकरिता सकाळी 8.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावासा वाटल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी     8.30 च्या पूर्वी किंवा 10 च्या नंतर करावा, असेही शासनाने सूचित केले आहे.
            या निमित्त आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे देशभक्तीवर आणि शहीदांच्या स्मृतीसाठी असावेत.                                     
----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा