मुंबई,
दि. 15 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक
कार्य संचालनालयातर्फे आयोजित चौथा सप्तरंग महोत्सव दिनांक 17 ते 19 फेब्रुवारी 2012
या कालवधीत गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे आणि दिनांक 21 ते 23 फेब्रुवारी 2012 या
कालावधीत डॉ. काशीनाथ नाट्यगृह, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात
गायन, वादन, नृत्ये, नाटय, चित्रपट अशा विविध कलांचा आस्वाद रसिकांना घेता येणार
आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्य
सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते दिनांक 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6.30
वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे करण्यात येणार आहे. उद्घाटना नंतर स्वरजल्लोष हा दर्जेदार मराठी गीतांचा विविधरंगी कार्यक्रम
सादर करण्यात येणार आहे.
दिनांक 18 फेब्रुवारी 2012 रोजी पहाटे
6.30 वाजता अनुराधा पौडवाल यांच्या भक्तीगीतांचा भक्तीतरंग हा कार्यक्रम
आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 6.30 वाजता आरती अंकलीकर- टिकेकर यांच्या
शास्त्रीय गायनाचा शिंपल्यातील स्वरचांदणे हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्रौ 8 वाजता
सोनिया परचुरे नृत्यलहरी हा
कथ्थक नृत्याचा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच त्यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली
शरयू नृत्य कलामंदिरचे विद्यार्थी बुध्दीबळ : एक नृत्याविष्कार हे समूह नृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन भाऊ मराठे करणार आहेत.
दिनांक 19 फेब्रुवारी 2012 रोजी पहाटे
6.30 वाजता स्वरमंथन हा अश्विनी भिडे- देशपांडे यांच्या शास्त्रीय तसेच
भक्तीसंगीत गायनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 6.30 वाजता सुबल सरकार यांना नृत्य
श्रध्दांजली अर्पण करणाऱ्या स्मृतीगंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहेत. या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन किशू पाल, सोनिया परचुरे व मयूर वैद्य
यांनी केले आहे.
दिनांक
21 फेब्रुवारी 2012 रोजी डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृह, ठाणे येथे रंगभूमी जीवन गौरव
पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी रंगभूमीवर अनेक वर्षे मोलाची कामगिरी
बजावलेल्या प्रसाद सावकार व सुधा करमरकर यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रदान
करण्यात येणार आहे.
दिनांक
22 फेब्रुवारी 2012 रोजी सायंकाळी 6.30 वाजता श्रीनिवास खळे यांना संगीतमय श्रध्दांजली
वाहण्यात येणार असून यशवंत देव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
राहणार आहेत. या कार्यक्रमात श्रीनिवास
खळे यांची गाजलेली गाणी सादर करण्यात येतील.
दिनांक 23 फेब्रुवारी 2012 रोजी
सायंकाळी 6.30 वाजता मूर्तीमंत अस्मिता या स्मिता पाटील यांच्या जीवनावर
आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सहा दिवस रंगणारा महाराष्ट्र शासनाचा
हा महोत्सव म्हणजे नामवंत कलाकार व गायकांना पाहण्याची व ऐकण्याची सुवर्णसंधीच
म्हणावी लागेल. शासनाचा हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेशिका सर्व नाट्यगृहांवर
उपलब्ध आहेत. तरी या कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी मोठया संख्येने आस्वाद घ्यावा, असे
आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.
0
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा