बुधवार, १८ जानेवारी, २०१२

चिल्ड्रन इन महाराष्ट्रा` संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त --मुख्य सचिव


मुंबई, दि. 17 : राज्यातील बालकांच्या स्थितीबद्दल संकलित माहिती असणारी `चिल्ड्रन इन महाराष्ट्रा-ॲन ॲटलस ऑफ सोशल इन्डीकेटर्स` ही पुस्तिका बालकल्याण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त आहे, असे मुख्यसचिव रत्नाकर गायकवाड यांनी आज येथे सांगितले.
महाराष्ट्र शासनाचा नियोजन विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आलेल्या `चिल्ड्रन इन महाराष्ट्रा-ॲन ॲटलस ऑफ सोशल इन्डीकेटर्स` या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यसचिवांच्या हस्ते आज त्यांच्या दालनात करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नियोजन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, युनिसेफचे महाराष्ट्र राज्य क्षेत्र अधिकारी तेजिंदरसिंग संधु यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन मोठ्याप्रमाणात विविध विकास कार्यक्रम, कल्याणकारी योजना राबवित आहे असे सांगून श्री. गायकवाड पुढे म्हणाले, बालकल्याण धोरण निर्मितीमध्ये आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेमध्ये या पुस्तिकेत देण्यात आलेली सर्व माहिती व आकडेवारी ही दिशादर्शक ठरणारी आहे.
लोकसंख्या आणि क्षेत्र, प्राथमिक शिक्षण, माता व शिशु आरोग्य, बालसंरक्षण आदी महत्त्वाच्या घटकांची माहिती `चिल्ड्रन इन महाराष्ट्रा` या पुस्तिकेत देण्यात आली आहे.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा