गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

ग्रंथोत्सव धुळेकरांसाठी ठरली एक पर्वणी !

गतिमान युगात आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या क्रांतीमुळे जी गती निर्माण झाली आहे.त्यात आपण स्वत: कुठे आहोत याबाबत माणूस स्वत:ला विसरत चालला आहे.अशा परिस्थितीत ग्रंथ हाच गुरु ही चळवळ नव्यानं उभी राहत असून वाचनाची आवड अनेकांना असते, मात्र काय वाचावं, कसं वाचावं, किती वाचावं हे प्रश्न अनेक वाचकांना नेहमीच सतावत असतात आणि त्यातच वाचन संस्कृतीचा वाचक कुठे तरी भरकटतो.

अशा भरकटलेल्या आणि गोंधळात सापडलेल्यांसाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रंथोत्सव २०११ हा उपक्रम जिल्हा माहिती कार्यालय, धुळे या कार्यालयाने दि. १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर, २०११ या कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिरात आयोजित केला होता. या ग्रंथोत्सवास मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला .

वाचाल तर वाचाल हे वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, आजच्या युगात माहिती आणि त्यातून मिळणारा नवा संदेश आपल्या जीवनात किती महत्वाचा आहे.याबाबत माणूस वाचन करताना विरंगुळा म्हणून वाचन करतो तो भाग वेगळा आणि स्वत:ला अद्यावत ठेवण्यासाठी आणि आजच्या युगात स्पर्धेत टिकून राहतो तो भाग वेगळा. वाचनातून मिळणारी माहिती, विचार, माणसाला प्रगल्भता देतात हे सांगणे नवं नाही. कारण जी माणसं सर्व अर्थानं मोठी झाली त्यांच्या चरित्रात वाचनातून मिळालेला विचारच त्यांना मोठं करण्यात समर्थपणे कामी आला असं त्यांच्या शब्दात त्यांनी लिहून ठेवलं.

वाचणारा माणूस अनेक महत्वाचे संदर्भ बोलू शकतो, लिहू शकतो आणि नवा विचार मांडून साहित्यातून समाजाला दिशा देण्याचं काम करू शकतो. साहित्य निर्मिती ही स्‍वत:ची कधीही नसते ती लोकांची होत असते. कोणी काय लिहीलं ती उत्सुकता वाचकांना असते. आणि घरटयात पिलांनी वाट पहावी तशी वाचक मंडळी साहित्यीकानं नवं काय लिहीलं यासाठी आसुसलेली असते. त्यातूनच वाचन संस्कृती निकोप तर होत जाते पुन्हा समृध्द होत जाते.

व्यक्तीसापेक्ष साहित्यिकांची विचारधारा स्विकारणे, नाकारणे हे वाचकांवर अवलंबून असते. म्हणून साहित्य कोणतेही असो त्याचा वाचक त्या-त्या पातळीवर स्वत:ला जे हवे ते घेवून समृध्द होण्यासाठी झपाटलेला असतो. कोणत्याही देशाची, त्याचप्रमाणे राज्य असेल, शहर असेल किंवा गाव असेल त्या गावाची समृध्दी तिथे असलेली माणसं कोणते ग्रंथ वाचतात, वाचनालय किती समृध्द आहे यावरुन मानली जाते कारण ग्रंथ हे समाजसुधारण्याचे ,समाजाला दिशा देण्याचे काम त्या-त्या विषयातून करत असतात.गावागावात पारायण ही संस्कृती जरी अध्यात्मिक असली तरी सार्वजनिक वाचन ही संकल्पना वाचन संस्कृतीशी जोडलेली आढळते. अशा विविधांगी विषयातून माणसं समृध्द होतात. ती ग्रंथ वाचनातून हे सांगणे न लगे.

वाचन संस्कृतीची जोपासना, वाचनाची समृध्दी, वाचक घडवण्याची प्रक्रिया, वाचनातून व्यापक जीवनदर्शन निर्माण झालेल्या महान कलाकृती, सर्वंकष वाचन, आत्मशोध, ज्ञानविश्व, संत साहित्य, स्त्री-स्वातंत्र्य, समग्र परिवर्तन, ग्रामीण जीवन, पुराणकथा, बालवाड़मय, कथा, कविता, कादंबरी, नाटक, वेब विश्व, विज्ञान, इतिहास या सार्‍या गोतावळयात ग्रंथ आमच्यासाठी आम्ही ग्रंथासाठी अशी नाती भक्कमपणे निर्माण करण्याची प्रक्रिया समर्थ करण्यासाठी हा ग्रंथ महोत्सव झाला.

तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, वृध्दांनी, महिलांनी आणि समर्थ वाचन संस्कृतीच्या प्रक्रियेत राहणार्‍यांनी या ग्रंथोत्सवात यशस्वी सहभाग नोंदविला. प्रत्येक गोष्ट माणूस विसरत चालला आहे. तेव्हा मातृदिन, बंधुदिन, प्रेमदिन असे अनेक दिवस साजरे होवू लागले आहेत. ग्रंथ हा शेवटचा माणूस जिवंत असेपर्यंत निर्माण होत राहणार आणि पुढचा येणारा वाचत रहाणार म्हणून ही संस्कृती कधीही नष्ट होणार नसली तरी नवनवीन आव्हानं समोर असताना घरात एक हक्काचं आपलं कोणीतरी असावं, जे सर्वकाळ साथ देतं आणि जीवनात अनेक वेळा मार्गदर्शक ठरतं ते एकमेव साधन म्हणजे आपला ग्रंथ होयं. या ग्रंथाशी नव्यानं नातं जोडावं. अशी भावना ! माणसाला समृध्द करण्यासाठी ग्रंथांनी जे दिलं त्याचा विसर कोणालाही पडू नये त्यासाठी धुळे येथील ग्रंथमहोत्सव पर्वणी ठरली !

ग्रंथोत्सवाच्या दि. १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या ग्रंथदिंडी, ग्रंथोत्सव कार्यक्रम, शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील आणि मंडळी यांचा रंग शाहिरी कलेचा कार्यक्रम, कवी सम्मेलन तसेच प्रथितयश लेखकाची प्रकट मुलाखतीत प्रा.अनिल सोनार, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद,धुळे जिल्हा यांची श्री. चंद्रशेखर पाटील, संचालक, मी महाराष्ट्र वाहिनी, धुळे यांनी साहित्य क्षेत्रावर आधारित घेतलेली प्रदीर्घ मुलाखत आदि बहारदार कार्यक्रमांचा साहित्य प्रेमी, कवी-कवयित्री, रसिक, नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला.

धुळे येथील ग्रंथोत्सवात जिल्हयातील साहित्य प्रेमी, रसिकांनी शासकीय ग्रंथालय आणि खाजगी ग्रंथालय धारकांकडून संत, वाड.मय, ललित लेखकांची पुस्तकांची मोठया प्रमाणात खरेदी करुन ग्रंथस्टॉल धारकांना मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला हे विशेष.


  • जगन्नाथ पाटील 
  • कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा