तुम्हाला सातबारा हवा आहे का ?, सेतु सुविधा केंद्रातील कोणताही दाखला हवा असल्यास, रेशन व्यवस्थित मिळत नसल्यास यासह विविध ३९ प्रकारच्या तक्रारी तुम्हाला घरबसल्या करता येणार आहेत. तर आता शासकीय कार्यालयात न जाता ही मागणी करता येणार आहे. आपला मोबाईल उचला ०२२-२७५७५९२० या क्रमांकावरती आपली तक्रार नोंदवा अथवा घरात इंटरनेट असेल तर http://kokandivision.com/ elokshahi या लिंक वर जा आणि तक्रार नोंदवा तुमच्या तक्रारीची दखल घेवून तुमचे काम त्वरीत होणार आहे. यामुळे तुम्हाला शासकीय कार्यालयात जायची गरज पडणार नाही . तसेच तुम्हाला सर्व विभागातील योजनांची माहिती लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच ठिकाणी मिळणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत ई- लोकशाही व नागरी सुविधा केंद्राची सुरूवात कोकण विभागात सर्वप्रथम करण्यात आली आहे. ई- लोकशाही दिनाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मालवण येथील रामभाऊ पांगे व दोडामार्ग येथील सुर्यकांत परमेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार सी.श्री.उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त डी.एस.डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी आर.एस.बर्गे, उपजिल्हाधिकारी प्रशासन अरविंद वळंजू, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.गणेश मुळे तसेच यावेळी प्रांताधिकारी सर्व तहसिलदार, विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोकशाही प्रक्रिया अधिक गतीमान व सुविधाजनक होण्यासाठी ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व विभागातील योजनांची एकत्रित माहिती मिळण्यासाठी नागरी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे.नागरी सुविधा केंद्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय अंतर्गत सर्व योजनांची एकत्रित माहिती मिळणार आहे.
ई-लोकशाही अंतर्गत नागरिक आपल्या निवास अथवा कोणत्याही ठिकाणाहून मोबाईल अथवा इंटरनेटवरून आपली तक्रार, निवेदन शासकीय यंत्रणेकडे दाखल करू शकतात. प्रायोगिक तत्वावर मोबाईलव्दारे ०२२-२७५७५९२० या क्रमांकावर तर इंटरनेटवर http://kokandivision.com/ elokshahi या वेबसाईटवरमध्ये तक्रार नोंदविता येणार आहे. या योजनेत सध्या काही त्रुटी असू शकतात. या संदर्भातील शंका अथवा त्रुटी जिल्हाधिकारी कार्यालयास लोकांनी कळवाव्यात. त्याची दखल घेतली जाईल असेही जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले.
पुणे येथील न्यू इंडिक्ट्रन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमीटेडचे प्रतिनिधी अतुल लोंढे यांनी ई- लोकशाही प्रणालीविषयक माहिती व प्रशिक्षण उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले. तक्रार निवारण प्रणालीअंतर्गत सध्या १ जानेवारी पर्यंत ०२२-२७५७५९२० या क्रमांकावरती नागरिकांनी आपली तक्रार नोंदवायची आहे. प्रथम भाषा पर्याय येईल. नंतर जिल्हा पर्याय येईल. त्यानंतर विविध विभागांसाठी नंबर पर्याय येतील. या पर्यायानंतर ३ मिनीटांत आपली तक्रार मोबाईलव्दारे सांगावयाची आहे. ती टेप होणार असून तोच आवाज आपल्याला पुन्हा ऐकू येईल. आपली तक्रार योग्य आहे का ?, ती जर योग्य असेल तर १ नंबर दाबावा लागेल.तर पुन्हा तक्रारीमध्ये काही बदल असल्यास २ नंबर दाबून नव्याने तक्रार नोंदविता येईल. तक्रार योग्य असल्याची खात्री आहे व आपण १ नंबर दाबल्यास आपल्याला एक टोकन नंबर सांगण्यात येईल.जेणेकरून नागरिक आपल्या तक्रारीचा नंतर आढावा घेवू शकणार आहेत. मोबाईलव्दारे जर आपण तक्रार नोंदविली तर आपल्याला तक्रार नोंद झाल्याचा संदेश येईल.मात्र दूरध्वनी वरून ही प्रक्रिया केल्यास हा संदेश मिळू शकणार नाही.
अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा तसेच ऑनलाईनसाठी ही याच प्रकारे संबधित तक्रारीचा मेसेज त्या विभागाकडे जाणार आहे.संबधित तक्रारी सात दिवसाच्या आत त्या त्या विभागाकडे जाणार असून त्याचे निराकरण ७ दिवसांच्या आत झाले नाही तर या तक्रारीचा संदेश वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार आहे.व सर्व तक्रारींचे निराकरण तात्काळ करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा