मुंबई,
दि. 21 : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे 22 ते 28 फेब्रुवारी 2012
या कालावधीत अकादमीच्या कलांगणात '' मस्त
मेजवानी '' महाराष्ट्र खाद्य महोत्सव-2012 आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, 22
फेब्रुवारी रोजी सांयकाळी 6.00 वाजता रविंद्र नाट्य मंदीर येथे या खाद्य
महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
ग्रामविकास व मुंबईचे
पालक मंत्री जयंत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे, सांस्कृतिक कार्य
राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान तसेच खासदार एकनाथ गायकवाड, आमदार नितीन सरदेसाई
आणि प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल कामत, नामांकित शेफ संजीव कपूर यावेळी उपस्थित राहणार
आहेत.
या
खाद्य महोत्सवात पुणे, नाशिक, कोकण, अमरावती, नागपूर, औरंगाबाद या सहा प्रशासकीय
विभागात माहिर असलेल्या गावरान, शाकाहारी व मांसाहारी खाद्य पदार्थांचे प्रदर्शन व
विक्री तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मासवडी, शिंगोळया, वडा कांदा, भाकरी, पांढरा व
तांबडा रस्सा, कोकणातील आंबोळ्या, मोदक, कुळथाचे पिठले व भाकरी, विविध प्रकारचे मासे,
उत्तर महाराष्ट्रातील हुरड्याचे थालीपीठ, भरली वांगी, वऱ्हाडी पुरणपोळी, मराठवाड्यातील
दही धपाटा, वांग्याचे भरीत आदी खाद्यपदार्थांची चव खवय्यांना चाखता येणार आहे.
लिम्का
व गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड यांनी गौरविलेल्या पुण्याच्या विलास करंदीकर संग्रहीत
भातुकलीच्या संस्कृती प्रदर्शनाचे 23 फेब्रुवारी पासून दररोज सकाळी 10.00 ते
रात्री 9.00 यावेळेत आयोजन करण्यात आले आहे. या भातुकली प्रदर्शनात हुबेहुब भांड्यांची
प्रतिकृती असलेली तांबे, पितळ, दगड, माती, लाकूड व चांदी या पासून बनविलेली विविध
प्रकारची दीडहजार भांडी रसिकांना पाहण्याची संधी मिळणार आहे.तर चिमुकल्यांना
विस्मृतीत गेलेले खेळ प्रत्यक्षात खेळावयास मिळणार आहेत.
या
खाद्य मेजवानीबरोबरच दररोज सायंकाळी 6.00 ते 9.00 या वेळेत पारंपरिक आदिवासी
नृत्ये, कोकण विभागातील कोळी नृत्ये, बाल्यानृत्ये, पश्चिम महाराष्ट्र, नागपूर,
नाशिक, औरंगाबाद, अमरावती या विभागातील
लोकनृत्ये, गाणी इत्यादी विविध लोककलाविष्काराचे दर्शन रसिकांना होणार आहे.
विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील
प्रख्यात पाकशास्त्र निपुणांना दररोज दुपारी 2.00 ते 4.00 या वेळेत महाराष्ट्रातील
प्रसिध्द खाद्य पदार्थांचे प्रात्यक्षिक सादर करण्याकरिता आमंत्रित करण्यात आले
असून प्रत्येक दिवशी दुपारी 4.00 ते रात्री 10.00 पर्यंत खाद्य पदार्थांचे
स्वतंत्र स्टॉल्स वाजवी दरात खुले असतील. या महोत्सवाद्वारे महिलांच्या पाककला
गुणांना चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील महिला बचत गटांना दिलेले मोफत स्टॉल्स हे
या खाद्य महोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे, असे कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका श्रीमती
सुप्रभा अगरवाल यांनी कळविले आहे.
0
0 000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा