बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१२

पर्यावरण विकास रत्न पुरस्कार प्राप्त गावांच्या यशोगाथा 'विकासरत्न' नसडगाव


विकासात्मक ध्यास आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर सामुहिक प्रयत्नातून गावाचा विकास कसा करता येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जालना जिल्ह्यातील नसडगाव ! जालना शहरापासून 35 कि.मी अंतरावर वसलेल्या नसडगावने  आतापर्यंत ग्रामविकासात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल अनेक पुरस्कार मिळवले आहेत. गावाने एकीच्या बळातून गावाचं केवळ रूप बदललं नाही तर स्वच्छ आणि स्वावलंबी गाव होण्याचा नावलौकीकही मिळवला आहे.
            ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या नसडगावला सन 2005-06 मध्ये 2 लाख रुपयांचा निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर गावाने मागे वळून पाहिलेच नाही. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत 23 लाख रुपयांचे काम हाती घेऊन 100 टक्के नळ योजना आणि नळ जोडणी  करून गाव थांबले नाही तर प्रत्येक घराला पाणी वितरण मीटर बसवून गावाने पाणी वापरावर नियंत्रण ठेवले आहे. 'पाण्याचे ऑडिट' ही संकल्पना भल्या भल्यांना रुचत नसताना गावाने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन ही कल्पना प्रत्यक्षात आणली.           
            गावाला 'जीवन' देणाऱ्या 'कल्याणी' नदीवर भूमीगत बंधारा घेतल्याने सार्वजनिक विहिरीला चांगले पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे गावाचा बारमाही पाण्याचा प्रश्न मिटला. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट रस्ता आणि समाज मंदिराचे काम करताना गावातील महिलांनी 'सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजने'  चा आधार घेत स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. योजनेतून गावातील अनेक महिलांनी स्वयंरोजगाराची नवी वाट चोखाळली.  रोजगार हमी योजनेंतर्गत गावात वृक्ष लागवड, शेततळे घेण्यात आले. यावर्षी रोहयो अंतर्गत सिंचन विहिरी आणि पाणंद रस्त्याची कामे हाती घेण्यात येत आहेत.
            गावात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असून महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान, एक गाव एक गणपती सारख्या नाविन्यपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीत गाव आघाडीवर आहे. श्रमदानातून 25 लाख रुपयांचे सामाजिक सभागृहाचे काम प्रगतीपथावर असून श्रमदानातून 4 कि.मी  लांबीच्या जोडरस्त्याचे काम हाती घेण्यात येत आहे.
गावाने  मिळवलेले पुरस्कार
*    निर्मल ग्राम पुरस्कार 2005-06  - पारितोषिक  -  2 लाख रुपये 
*    संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तर पुरस्कार 2005-06 - पारितोषिक    3 लाख रुपये 
*    संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तर पुरस्कार 2007-08 - पारितोषिक  3 लाख रुपये  
*    संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागस्तर पुरस्कार 2007-08 - पारितोषिक    10 लाख रुपये
*    फुले-शाहू-आंबेडकर स्वच्छ दलित वस्ती अभियान -जिल्हास्तर- पारितोषिक   5 लाख रुपये
*    यशवंत पंचायतराज अभियान 2007-08 विभागस्तर पुरस्कार - पारितोषिक -   1 लाख रुपये
*    यशवंत पंचायतराज अभियान 2008-09 विभागस्तर पुरस्कार - पारितोषिक -2 लाख रुपये
*    महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान जिल्हास्तरावर विशेष पुरस्कार - पारितोषिक 1.25 लाख रुपये
*    आदर्श आंगणवाडी पुरस्कार जिल्हास्तर  पुरस्कार 2009-10- पारितोषिक 0. 25 लाख रुपये

                                                                                                                                                . . 2/-

(विशेष लेख ) 'विकासरत्ननसडगाव  . . 2/-


            गावात 100 टक्के भूमीगत गटारे असून यातील पाण्यातून परसबागा फूलवण्यात आल्या आहेत. गावात 27 सौर पथदिवे आहेत, दारिद्र्य रेषेखालील 47 कुटुंबांकडे सौर दिवे आहेत. हे काम संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि फुले शाहु आंबेडकर स्वच्छ दलित वस्ती अभियानांतर्गत प्राप्त पुरस्कारातून करण्यात आले. यासाठी 7.5 लाख रुपयांचा खर्च आला. गावाने घन कचरा व्यवस्थापन, गांडुळ खत, बायोगॅस, घर तिथे वृक्ष यासारख्या नाविन्यपूर्ण कल्पना गावात राबविल्या आहेत.
            विकासात्मक कामात स्वत:ची आगळी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नसडगावाने विविध क्षेत्रातील नामवंत लोकांना स्वत:कडे आकर्षित केले आहे. श्रीलंका, बांग्लादेश, इंडोनेशिया यासारख्या देशातील पथकांनी या गावास भेटी देऊन गावाच्या विकास कामांची पाहणी केली आहे, गावाच्या सामुहिक कार्याचा अभ्यास केला आहे.
            गावाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत सहभाग तर घेतलाच शिवाय गावात 100 टक्के प्लास्टिक बंदी आणि शौचालय वापर सुरु केला आहे. गावात 1054 वृक्षांची लागवड झाली आहे. मग्रारोहयोअंतर्गत 5 हजार वृक्षांची रोपवाटिका  हाती  घेतांना झाडांच्या संगोपनाची जबाबदारी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती आणि कुटुंब प्रमुखांनी आपणहून घेतली आहे.  सामुहिक प्रयत्नातून गावाला स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेणाऱ्या या गावाची दखल जागतिक बँकेने घेतली असून जागतिक बँकेचे उपाध्यक्ष डॉ. मार्वन मुशेर यांनी  गावाने केलेल्या विकास कामांची पाहणी केली. यावेळी  त्यांनी संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम, जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत गावाने केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले. यात प्रामुख्याने वैयक्तिक स्वच्छता, शौचालयाचा वापर, सांडपाणी व्यवस्थापन, 100 टक्के कर वसुली, ग्रामपंचायत क्षेत्रात केलेला अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, श्रमदानातून झालेला गावाचा विकास इ. चा समावेश होता.
            विकासाचा ध्यास घेऊन प्रगतीकडे केलेल्या वाटचालीमुळेच पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत विकासरत्न पुरस्कार देऊन नसड गावाला गौरविण्यात आले आहे.
. . .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा