मुंबई, दि. 10 : झी 24 तास वृत्त वाहिनीच्या वतीने आयोजित ‘संघर्षाला हवी साथ’ या उपक्रमांतर्गत आर्थिक परिस्थितीवर मात करुन दहावीच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचा सत्कार शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृह येथे करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आमदार हर्षवर्धन पाटील, चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे, मनोज जोशी, झी 24 तासचे संपादक डॉ. उदय निरगुडकर उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले की, आर्थिक परिस्थितीला दोष न देता परिस्थितीशी संघर्ष करुन या गुणवंत विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळविलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. झी 24 तासच्या वतीने हाती घेतलेला हा उपक्रम हा समाजासाठी पथदर्शी आहे. या वृत्तवाहिनीने केलेले सामान्यातलं असामान्य कर्तृत्व ओळखण्याचे केलेले कार्य आपण सर्वांनी समाजाचा घटक म्हणून करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन झी 24 तास वृत्तवाहिनीच्या वतीने जमा केलेल्या धनादेशाचे वाटप केले.
००००००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा