मुंबई, दि. 6 : वार्षिक शैक्षणिक नियोजनाच्या दृष्टीने सर्व विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया, पात्रता प्रक्रिया व परीक्षा एकाच वेळी सुरु झाल्यास महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन अधिक चांगले होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्व विद्यापीठांनी शैक्षणिक वेळापत्रकाचे सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिल्या.
श्री. तावडे म्हणाले की, शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार व कधी संपणार या तारखा विद्यापीठ स्तरांवर ठरविणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया व परीक्षा पध्दतीत सुसूत्रता येईल.यासाठी 3 ते 4 जणांची देखरेख समिती स्थापन करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची राज्याच्या उच्च शिक्षणाबाबत भविष्यकालीन धोरणे, योजना, प्रशासन व अंमलबजावणी याबाबतची बैठक श्री. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरु व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2014, विद्यापीठ स्तरावरील विविध समस्या, सेवार्थ प्रणाली विद्यापीठांमध्ये लागू करण्याबाबत अहवाल तयार करणे, सेवा हमी कायदा लागू करणे, ॲकॅडमी ऑडिट, रुसा, विद्यापीठीय प्राधिकरणे व विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका, परदेशातील विद्यापीठे, महाविद्यालये व संस्था, उद्योग यांच्याशी विद्यापीठांनी केलेले करार आदी विविध विषयांबाबत यावेळी श्री. तावडे यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंशी सविस्तर चर्चा करुन आवश्यक कार्यवाहीबाबत सूचना केल्या.
००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा