मुंबई, राज्यातील 188
नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या निवडणुका 8 डिसेंबर 2011 रोजी होणार होत्या. परंतु
बऱ्याच नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या प्रभागांतील उमेदवारी अर्जांसंदर्भात न्यायालयात
अपील दाखल झाल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता 177
नगरपरिषदांच्या निवडणुका 11 डिसेंबर 2011 रोजी, तर आज
(ता. 2 डिसेंबर) न्यायालयाचा निकाल लागलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका 13 डिसेंबर
2011 रोजी होणार आहेत.
ज्या
नगरपरिषदा/नगरपंचायतींसंदर्भात अपील दाखल झालेले नाही, तसेच जेथील अपिलांवरील
न्यायालयाचा निर्णय 1 डिसेंबर 2011 पर्यंत प्राप्त झाला आहे. त्यांचे मतदान 11
डिसेंबर 2011 रोजी घेण्यात येईल. या निवडणुकांचा जाहीर प्रचार 9 डिसेंबर 2011 रोजी
रात्री बारा वाजता संपेल. त्यांची मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा
दुसऱ्या दिवशी 12 डिसेंबर 2011 रोजी होईल.
ज्या
नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या काही प्रभागात अपील झाले होते व ज्या अपिलांवरील निर्णय
2 डिसेंबर 2011 रोजी प्राप्त झाले आहेत त्यांचे मतदान 13 डिसेंबर रोजी होईल.
त्यांचा जाहीर प्रचार 11 डिसेंबर 2011 रोजी रात्री बारा वाजता संपेल. त्यांची
मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा दुसऱ्या दिवशी 14 डिसेंबर 2011
रोजी होईल.
ज्या
नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या मुदती 16 डिसेंबर 2011 पर्यंत संपणार आहेत आणि
ज्यांच्या अपिलांचे निकाल 2 डिसेंबर 2011 पर्यंत प्राप्त झालेले नाहीत. त्या
नगरपरिषदांची स्थापना करण्यासाठी, अपील झालेल्या जागांशी संबंधित प्रभाग वगळून
उर्वरित प्रभागांतील जागांची संख्या जर नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या एकूण जागांच्या
2/3 (दोन तृतीयांश) किंवा त्यापेक्षा अधिक होत
असल्यास सदर नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या अपिलात नसलेल्या प्रभागातील
जागांसाठीचे मतदान 11 डिसेंबर 2011 रोजी होईल. तसेच ज्या प्रभागांतील जागांकरिता
अपील झालेले आहे, परंतु निकाल लागलेले नाहीत व ज्या नगरपरिषदांची मुदत 16 डिसेंबर
2011 रोजी संपत आहे. त्या नगरपरिषदांची स्थापना करण्यासाठी अपील झालेल्या जागांशी
संबंधित प्रभाग वगळून उर्वरित प्रभागातील जागांची संख्या जर
नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या एकूण जागांच्या 2/3 (दोन तृतीयांश) किंवा त्यापेक्षा
अधिक होत नसेल तर सदर नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या प्रलंबित अपिलात असलेल्या जागा
वगळून उर्वरित सर्व जागांसाठी 11 डिसेंबर 2011 रोजी मतदान होईल.
नगरपरिषदांच्या मतदानाच्या
जाहीर प्रचाराची समाप्ती त्या
त्या दिवशी रात्री बारा वाजता होणार असली तरी राजकीय पक्ष व उमेदवारांना रात्री
दहा नंतर सार्वजनिक सभा, मोर्चे, ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही, असे राज्य
निवडणूक आयोगाने कळविले आहे.
नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र
स्वीकारणे अथवा नाकारण्याच्या निर्णयाविरुद्ध नगरपरिषद निवडणूक नियम 1966 च्या
नियम 15 मधील तरतुदीनुसार संबंधित उमेदवारास जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील दाखल
करता येईल, अशी तरतूद असल्याने बऱ्याच प्रभागातील उमेदवारी अर्जांसंदर्भात अपील
दाखल झाले आहेत. या अपिलांचा निकाल जाहीर झाल्यापासून उमेदवारी मागे घेण्याकरिता
तीन दिवसांचा कालावधी देण्याची तरतूद या नियमात आहे आणि उमेदवारी मागे घेण्याच्या
दिनांकापासून आठव्या दिवसाचा दिनांक मतदानाकरिता पुनर्निर्धारित करण्याची तरतूद
आहे.
वेगवेगळ्या प्रभागांमधील
अपिलांचे निकाल वेगवेगळ्या दिवशी लागल्यामुळे सर्व नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या
निवडणुका एकाच दिवशी म्हणजे 8 डिसेंबर 2011 रोजी घेता येणे शक्य नाही. तसेच बहुतेक
नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या मुदती 16 डिसेंबर 2011 रोजी संपत आहेत. या कालावधीत
नवीन नगरपरिषदा/नगरपंचायतींची स्थापना होणे आवश्यक आहे.
दरम्यान, 23 डिसेंबर 2011
रोजी होणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील बिलोली, मुदखेड, मुखेड, कंधार, कुंडलवाडी,
देगलूर या सहा आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ही एक अशा एकूण सात नगरपरिषदांच्या
निवडणुकांच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या निवडणुका
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच होतील.
0-0-0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा