शनिवार, ६ जून, २०१५

वृक्षारोपण चळवळ ही लोकचळवळ व्हावी -पालकमंत्री दादाजी भुसे पर्यावरण सप्ताह निमित्त आर्वी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्ष लागवड





धुळे, दि. 6 :- वृक्षारोपण चळवळ ही लोकचळवळ व्हावी.  प्रत्येक नागरिकाने जर एक झाड लावले तर शासकीय उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण होईल.  त्यामुळे प्रत्येक नागरिकाचे वृक्षारोपण करावे, असे आवाहन राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
धुळे तालुक्यातील आर्वी येथे स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ  दि. 3 ते 9 जून या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण सप्ताह निमित्त राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मधुकर गर्दे, दरबारसिंग गिरासे, उपजिल्हाधिकारी श्रीमती हेमांगी पाटील, उप विभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, आर्वीच्या सरपंच श्रीमती श्रीमती मंगलताई केले, धुळे पंचायत समिती उपसभापती सखाराम पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाणे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) बी. ए. बोटे, गट विकास अधिकारी जी. ए. पाटील, उप विभागीय कृषि अधिकारी प्रल्हाद सोनवणे, तहसिलदार अरूण शेवाळे, तालुका कृषि अधिकारी अण्णासाहेब दागळे,  आर्वीचे उपसरपंच किशोर देवरे, वसंत ठाकरे, नागेश देवरे, सतीश महाले, हिलाल माळी, भगवान देवरे, वाल्मिक बागडे, शेनपडू पवार, विनायक केले आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे त्याच बरोबर गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती जाग्या ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दरवर्षी पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  पर्यावरणाच्या ऱ्हासाचे गंभीर परिणाम निसर्ग व माणसांवर होत असल्याचे सांगून ते म्हणाले की,   मागील महिन्यात नेपाळमध्ये झालेला भूकंप, महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपीट ही निसर्गाचे संतुलन बिघडल्याचे संकेत आहेत.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल होत आहे.  या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीर आहे.  या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत केली आहे.  ज्या गावाची आणेवारी 50 पैश्यापेक्षा कमी आहे.  त्या गावाला मदत देण्यात आली आहे.  ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे त्या कर्जाचे पुनर्गठन 5 वर्षासाठी करण्यात येणार आहे.  पुनर्गठित कर्जाचे पहिल्यावर्षीचे व्याज सरकार भरणार असून त्यापुढील वर्षासाठी 6 टक्के व्याज आकारणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, आपण झाडे खूप लावली पण त्यापैकी किती झाडे दुसऱ्यावर्षी जगली याचा आढावा घेतला पाहिजे.  लावलेल्या झाडांपैकी 75 टक्के झाडे जगली पाहिजेत यासाठी प्रयत्न केले पाहिजे.  वृक्षारोपण ही लोकचळवळ बनली पाहिजे ज्यातून जास्ती-जास्त वृक्ष लागवड होईल. हवामानाची माहिती 1 लक्ष पेक्षा जास्त शेतकऱ्यांना एस.एम.एस. व्दारे शासनाकडून दिली जाते ही संख्या वाढवून 10 लक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहण्याचे उद्दिष्ट शासनाचे आहे.
            यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली असली तरी अनेक लोकांना घरे नाहीत, पुरेसे कपडे नाहीत, पुरेसे अन्न नाही, तळागाळातील व्यक्तिंचा विकास करण्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन एकत्रितपणे काम केले तर महाराष्ट्र व देशाचा विकास होऊ शकतो. 
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, जिल्ह्यात 25 लक्ष वृक्ष लागवड या पावसाळयात करण्याचे नियोजन आहे.  वन विभाग, कृषि विभाग, ग्राम पंचायती  यांचा त्यात सहभाग घेण्यात येणार आहे.  पुढील पाच वर्षात 6 हजार गावे जलयुक्त शिवार अभियानात घेण्यात येणार आहे.  वृक्ष लागवडीचा उपक्रम हा जलयुक्त शिवार अभियानास पुरक कार्यक्रम आहे.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, वृक्ष लागवडीसाठी लोकांनी सहभाग घेतला तर उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण जिल्ह्यात करण्यात येईल.  लोकसहभाग असेल तर ती योजना प्रभावीपणे राबविण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.
            जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मधुकर गर्दे म्हणाले की, वने वाढविण्याची अत्यंत आवश्यकता आहे.  वने कमी होत असल्यामुळे पयावरणाचे संतुलन बिघडले आहे.  भविष्यात जर पर्यावरणाचे संतुलन राखावयाचे असेल तर निसर्गाचे संवर्धन करणे आवश्यक आहे.  दरवर्षी लळींग कुरणात वृक्षारोपण करण्यात यावे.  कुऱ्हाड बंदी, चराई बंदी करण्याची लळींग कुरणात अत्यंत आवश्यकता आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोहर पाटकर यांनी केले. 
000000

            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा