मुंबई दि 30: शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन करणे खूप आवश्यक असते. वाचन हा आपल्या यशाकडे नेण्याचा मार्गच आहे आणि म्हणूनच वाचाल तर आयुष्यात यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन न्युरोलॉजिकल व स्पायनल सर्जन डॉ. प्रेमानंद रामानी यांनी केले.
मुंबईच्या क्षात्रकुलोत्त्पन्न मराठा समाजच्या वतीने कै.ध.ह.गांवकर यांच्या96व्या जयंतीनिमित्त परेल येथील शिरोडकर हायस्कूल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विधीमंडळ अपक्ष आमदार आघाडीचे सचिव ॲड. प्रविण टेभेंकर, क्षात्रकुलोत्त्पन्न मराठा समाजाचे अध्यक्ष श्रीपाद फाटक, व्ही. एस. चौगुले, शिेरोडकर हायस्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ. रामानी आपल्या भाषणात म्हणाले की, श्री. गांवकर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य मोठे आहे. आजच्या पिढीने त्यांच्यापासून बोध घेणे आवश्यक आहे. आज अनेक विद्यार्थी शालेय ज्ञानात विकास करताना अवांतर वाचनालाही महत्व देते आहेत. कारण व्यक्तिमत्व विकासासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अवांतर वाचन खूप उपयोगी पडते. म्हणून विद्यार्थ्यांनी वाचनाला फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे डॉ. रामानी यांनी सांगितले. इंटरनेट आणि मोबाईल यांचा प्रभाव आपल्यावर होत असला तरी ग्रंथालयाचेही तितकेच महत्व आहे, हे विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवावे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमात श्रीपाद फाटक, रवींद्र कुवेसकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा