गुरुवार, ८ डिसेंबर, २०११

ग्रंथोत्सव-2011 व ग्रंथविक्री केंद्राचा जनतेने लाभ घ्यावा



      धुळे, दि.;- दर्जेदार ग्रंथ जनतेपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे राज्यात सर्व जिल्हयात सुरु असलेले ग्रंथोत्सव अभियान जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने दि. 13 ते 15 डिसेंबर, 2011 पर्यंत तीन दिवस राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिर येथे ग्रंथोत्सव-2011 चे आयोजन करण्यात आले आहे.  ग्रंथोत्सवातील पुढील कार्यक्रमांचा जिल्हयातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागीय माहिती उपसंचालक प्रसाद वसावे व जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील यांनी केले आहे.
       ग्रंथोत्सवात मंगळवार दि. 13 डिसेंबर, 2011 रोजी सकाळी 9-30 वाजता सर्वोदय कॉलनी, न्यू सिटी हायस्कूलजवळील जिल्हा शासकीय ग्रंथालय येथून ग्रंथदिंडी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे धुळे जिल्हा अध्यक्ष प्रा. अनिल सोनार यांच्या हस्ते उदघाटन होणार असून, ग्रंथदिंडी स्वस्तिक चित्र मंदिर, फुलवालाचौ आग्रारोड मागे ग. क्र. 6 येथून पारोळा रोड या मार्गाने निघणार असून  ग्रंथदिंडीचा समारोप राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिर, पारोळा रोड, धुळे येथे सकाळी 11-00 वाजता होईल.  यावेळी महापौर सौ.मंजुळा गावीत, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे, महानगरपालिका आयुक्त हनुमंत भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
       ग्रंथोत्सवात दि. 13 ते 15 डिसेंबर, 2011 या दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिर पारोळा रोड येथे होणार आहे. मंगळवार दि. 13 डिसेंबर, 2011 रोजी सकाळी 11-00 वाजता ग्रंथजत्रेचे उदघाटन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या हस्ते होईल.  यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक व उपस्थित मान्यवरांचे विचार प्रकटन तसेच सायंकाळी 6-00 ते रात्रौ 9-00 रंग शाहिरी कलेचा, शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील आणि मंडळी यांचा कार्यक्रम होईल.
       दि. 14 डिसेंबर, 2011 रोजी सायंकाळी 6-00 ते रात्रौ 9-00 कवी संम्मेलन आयोजित करण्यात आले आहे, दि. 15 डिसेंबर, 2011 रोजी सायंकाळी 6-00 ते रात्रौ 9-00 सुप्रसिध्द मराठी साहित्यिक     प्रा. अनिल सोनार यांची मुलाखत मी महाराष्ट्र वाहिनीचे संचालक चंद्रशेखर पाटील हे घेतील. 
       ग्रंथोत्सव स्थळी ग्रंथ विक्री केंद्रावर हजारो महत्वपूर्ण ग्रंथांचा खजिना तीन दिवस वाचकांसाठी सकाळी 9-30 वाजेपासून खरेदीस उपलब्ध राहील. तरी ग्रंथोत्सव कार्यक्रम व ग्रंथविक्री केंद्राचा जनतेने लाभ घ्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा