सोमवार, १९ डिसेंबर, २०११

शाहिर शिवाजीराव पाटील यांनी पोवाडयातून वाचन संस्कृतीचं महत्व सादर केले


जळगांव दिनांक  :- सर्व ग्रंथामध्ये सर्वश्रेष्ठ ग्रंथ  ` गीता ` असून प्रत्येक व्यक्तीने जीवनात एक वेळेस तरी गीता वाचन करावे अशी साद शाहिर शिवाजीराव पाटील यांनी काल (दिनांक 17 डिसेंबर रोजी ) झालेल्या `रंग शाहिरी कलेचा` या कार्यक्रमात उपस्थित रसिकांना घातली.
                शासनाने प्रकाशित केलेले ग्रंथ सर्व सामान्यपर्यंत पोहोचावेत म्हणून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत एम.जे.कॉलेजमध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन केलेले आहे. सदरच्या ठिकणी सायंकाळी 6 ते 8 या कालावधीत रंग शाहिरी कलेचा या कार्यक्रमात शाहिर शिवाजीराव पाटील यांनी आपल्या भारदास्त आवाजात कवियत्री बहिणाबाईच्या ओव्या, महाराष्ट्राचा पोवाडा सादर केले.
            ग्रंथोत्सवाची महत्‍ती कथन करणारे शाहिरी काव्य यांनी यावेळी सादर केले. त्यातून त्यांनी शिक्षणाचे महत्व सांगून ग्रंथ, साहित्य वाचनाने नैतिकतेचा विकास व्यक्तीमध्ये होत असतो असे सांगितले. तसेच अहिराणी भाषेतून ही शाहिर पाटील व त्यांच्या सहका-यांनी ग्रंथ वाचनाविषयी प्रबोधनात्मक पोवाडा सादर केला त्यास उपस्थित रसिकांनी टाळयांच्या कडकडात करुन मोठा प्रतिसाद दिला.
            भारतातील प्राचीन ग्रंथाचे महत्व पोवाडयातून सादर करताना शाहिर पाटील यांनी सर्व ग्रंथामध्ये `गीता` ग्रंथ सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले. त्यांनी पोवडयातून गीता ग्रंथाचे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात किती महत्व आहे हे सोप्या पध्दतीने समजावून सांगितले. गीता ग्रंथाशिवाय कोणताही ग्रंथ श्रेष्ठ नाही. जीवनाचे सर्वसार गीता ग्रंथातून स्पष्ट करण्यात आले आहे.
            प्रारंभी शाहिर शिवाजीराव पाटील व त्यांच्या सहका-यांचा पुष्पगुच्छ देऊन जिल्हा माहिती अधिकारी रजेसिंग वसावे यांनी सत्कार केला.
कार्यक्रमाच्या वेळेत बदल :-
            जिल्हयातील सर्व वाचक व नागरिकांना कळविण्यात येत आहे की, ग्रंथोत्सावात दिनांक 19 डिसेंबर, 2011 रोजी सादर होणारा पथनाटयाचा कार्यक्रम हा सायंकाळी 6 ते 9 ऐवजी त्याच दिवशी सायंकाळी 4 ते 6 या कालावधीत होणार आहे. याची सर्व वाचक, नागरिकांनी नोंद घ्यावी. 
ग्रंथ विक्रीस मोठा प्रतिसाद :-
            ग्रंथोत्सवात शासकीय ग्रंथालयाच्या विक्री केंद्रास वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रदर्शनाच्या पाहिल्याच दिवशी शेकडो ग्रंथाची विक्री झाली आहे. आज दुपारी पर्यंत सुमारे 60 ते 70 हजार रुपयांची विक्री झाल्याचे केंद्राच्या सुत्राकडून सांगण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा