बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

दहावीची परीक्षा 1 मार्च पासून


मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे मार्च, 2012 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळात 1 मार्च 2012 पासून  सुरु होत आहे.
विज्ञान व पूर्व व्यावसायिक शाखेमधील विषयांची प्रात्यक्षिके, तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येईल. विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा, विज्ञान विषयाच्या लेखी परीक्षेच्या कालावधीत आणि तोंडी व श्रेणी परीक्षा सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी तर तंत्र व पूर्व व्यावसायिक विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2012 या कालावधीत घेण्यात येईल.
            मुकबधीर, बहुविकलांग या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शरीर व आरोग्यशास्त्र तसेच गृहशास्त्र या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा सोमवार दिनांक 23 एप्रिल 2012 रोजी अनुक्रमे सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये घेण्यात येईल. प्रात्यक्षिक परीक्षेची निश्चित तारीख व दिवस इत्यादी माहितीसाठी परीक्षार्थींनी शाळा प्रमुखांकडे 11 फेब्रुवारी 2012 पूर्वी संपर्क साधावा.
परीक्षार्थींनी परीक्षेच्या दिवशी परीक्षास्थळी सकाळी 10 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा सुरु होण्याच्या नियोजित वेळेनंतर 30 मिनीटांपेक्षा उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही व सदर विषयाला अनुपस्थित समजण्यात येईल.
अंध तसेच सेरेब्रल पाल्सी, अस्थिव्यंग, अल्पदृष्टी, कॅन्सरग्रस्त, मज्जातंतू विकारग्रस्त, स्वमग्न विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा प्रत्येक तासाला 20 मिनिटे या प्रमाणात जास्त वेळ तर  मुकबधीर विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी एकूण 30 मिनिटे आणि अध्ययन अक्षमता विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी लेखी परीक्षेच्या निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा 25 टक्के जास्त वेळ देण्यात येईल. सर्वसाधारण परीक्षार्थ्यांपेक्षा बहुविकलांग परीक्षार्थींना 90 मिनीटे जादा वेळ प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी देण्यात येईल. परंतु यासाठी मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
परीक्षार्थींनी आपल्या उत्तरपत्रिकेवरील व पुरवणीवर विहीत जागेवर आपला बैठक क्रमांक अक्षरात व अंकात बिनचूक लिहावा. उत्तरपत्रिका व पुरवणीच्या अन्य कोणत्याही भागात बैठक क्रमांक लिहिल्यास किंवा ओळख पटविण्यासाठी सांकेतिक खुण केल्यास या सूचनेचा भंग केला म्हणून त्याची शिक्षासूचीनुसार संपादणूक रद्द करण्यात येईल. परीक्षार्थींना परीक्षा कक्षात कोणतेही पुस्तक वा कागद आणण्यास मनाई आहे.
            सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकेवर बारकोड पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना बारकोड संबंधीची माहिती परीक्षा सुरु होण्यापूर्वी देण्यात येणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी 30 मिनिटे अगोदर परीक्षागृहात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका एकच असून त्यामध्ये भाग 1 व 2 असे दोन वेगवेगळे भाग आहेत. त्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका प्रत्येक भागाप्रमाणे सोडविण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा