मुंबई, दि.
31 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी /
मार्च 2012 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी)
तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम
परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या
विभागीय मंडळात दिनांक 21 फेब्रुवारी 2012 पासून
सुरु होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.
परीक्षार्थींनी
प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखांपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षेचे निश्चित स्थळ व
वेळेबाबत उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांशी संपर्क साधून
खातरजमा करावयाची आहे. प्रात्यक्षिक /तोंडी परीक्षा/ श्रेणी परीक्षा गुरुवार
दिनांक 2 फेब्रुवारी ते शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2012 या कालावधीत घेण्यात येणार
आहे. प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, श्रेणी परीक्षेची ''आऊट ऑफ टर्न''
परीक्षा शुक्रवार दिनांक 30 मार्च व
शनिवार दिनांक 31 मार्च 2012 रोजी घेण्यात येईल. स्टेनोग्राफी (इंग्रजी) या विषयाची
प्रात्यक्षिक परीक्षा बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी तर स्टेनोग्राफी (मराठी) या विषयाची परीक्षा गुरुवार
दिनांक 9 फेब्रुवारी 2012 रोजी घेण्यात येईल.
परीक्षार्थींनी
परीक्षेच्या दिवशी परीक्षास्थळी प्रथम सत्रात सकाळी 10.30 वाजता व द्वितीय सत्रात
दुपारी 2.30 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा सुरु होण्याच्या नियोजित
वेळेनंतर 30 मिनीटांपेक्षा उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रवेश दिला
जाणार नाही.
परीक्षार्थींनी
उत्तरपत्रिकेच्या व पुरवणीच्या मुखपृष्ठावर ठराविक जागेवरच आपला बैठक क्रमांक
अक्षरात व अंकात बिनचूक लिहावयाचा आहे. ठराविक जागा सोडून अन्यत्र कोठेही
लिहिण्यास सक्त मनाई आहे. या सूचनेचे उल्लंघन
केल्यास विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यात येईल. बारकोडसंबंधी
उत्तरपत्रिकेवरील सूचना वाचून त्याप्रमाणे निश्चित केलेल्या जागी बारकोड स्टीकर व
होलोग्राफ स्टीकर चिकटविणे आवश्यक आहे.
प्रवेशपत्राशिवाय
परीक्षार्थ्यांस परीक्षेस बसण्यास अनुमती दिली जाणार नाही. परीक्षार्थींना परीक्षा
कक्षात कोणतेही पुस्तक, कागद, मोबाईल फोन, पेजर, आयपॉड, तत्सम साहित्य नेण्यास
सक्त मनाई आहे तसेच प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेकरीता कॅल्क्युलेटर किंवा इतर
कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करता येणार नाही. अध्ययन अक्षमता
विद्यार्थ्यांना फक्त गणित आणि पुस्तपालन व लेखाकर्म या विषयाच्या लेखी
परीक्षेसाठी कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी आहे परंतु यासाठी मंडळाची
पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
अध्ययन
अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा
एक तास जास्त वेळ देण्यात येईल. मुकबधीर, कर्णबधीर विद्यार्थ्यांना लेखी
परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा अर्धातास जास्त वेळ दिला जाईल. तसेच अंध,
अस्थिव्यंग, शारीरिक अपंग व सेरेब्रल पाल्सी या व्याधीने बाधित असलेल्या
विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा प्रत्येक तासाला
वीस मिनिटे या प्रमाणात जास्त वेळ देण्यात येईल. परंतु यासाठी मंडळाची
पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
माहिती
तंत्रज्ञानाची परीक्षा सोमवार दिनांक 26 मार्च ते बुधवार 28 मार्च 2012 या
कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षार्थींनी त्यांच्या मूळ महाविद्यालयाच्या
अथवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून परीक्षेच्या वेळेची
माहिती करून घ्यावी, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा