धुळे, दि. 6 :-
पशुपालकांसाठी नाविण्यपूर्ण योजनेतंतर्गत सन 2015-16 या वर्षासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती गटाच्या पशुपालकांना 6 दुधाळ गायी, म्हैस वाटप, अंशत:
ठाणबंद पध्दतीने 10 शेळी व एक बोकड वाटप, 1 हजार मांसल कुक्कुट पक्षी वाटप
(ब्रॉयलर) याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना पशुसंवर्धन खात्याच्या
संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
तरी पशुपालकांनी 3 ऑगस्ट, 2015 पर्यंत पंचायत समितीच्या पशुधन विकास
अधिकारी (विस्तार) यांच्याकडे अर्ज जमा करून पोच घ्यावी, असे आवाहन जिल्हा
पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. यु. डी. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
या योजनेचे आर्थिक निकष, मार्गदर्शक
सूचना, महत्वाच्या अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. सर्वसाधारण गटासाठी 50 टक्के अनुसूचित जाती,
जमातीसाठी 75 टक्के अनुदान देय राहील. या
योजनेंतर्गत 3 टक्के अपंग, विकलांग व 30 टक्के महिला लाभार्थ्यांना निवड
प्रक्रियेत लाभ देण्यात येईल. जे लाभार्थी
त्यांच्या हिश्याची रक्कम स्वत: उभारतील किंवा बँकेकडून कर्ज रूपाने उपलब्ध करून
घेतील अशा लाभार्थींची निवड प्राधान्याने करण्यात येईल. परंतु विहीत वेळेत काही लाभार्थी स्वत:च्या
हिश्याची रक्कम न उभारू शकल्यास किंवा रक्कम उभारण्यास असमर्थता दर्शविल्यास
प्रतिक्षा यादीतील जे लाभार्थी स्वत:च्या हिश्याची रक्कम उभारण्यास तयार आहेत त्या
लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. या
योजनेखाली दुधाळ जनावरांची खरेदी शक्यतो राज्याबाहेरील जनावरांच्या बाजारातून
करण्यात येईल, जेणेकरून राज्याच्या दुग्धोत्पादनामध्ये वाढ होऊ शकेल. दुधाळ जनावरे खरेदी केल्यानंतर या जनावरांची
वाहतूक लाभार्थींच्या गावापर्यंत करण्यासाठी येणारा खर्च, जनावरांच्या ट्रांझीट विम्याचा खर्च
लाभार्थ्याने स्वत: करावयाचा आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी विहीत अर्जाचा
नमुना व योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयातील पशुधन
विकास अधिकारी (विस्तार) यांचेकडे संपर्क साधावा, असेही पत्रकात नमूद केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा