बुधवार, २९ जुलै, २०१५

पुनर्वसित गावात अपूर्ण नागरी सुविधांची कामे त्वरित कार्यान्वित कराव्यात -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 29 :- पुनर्वसित गावातील अपूर्ण नागरी सुविधांची कामे  त्वरित पूर्ण करून त्या कार्यान्वित कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी संबंधितांना दिल्या.  
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली निम्न पांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पाच्या पुनर्वसन व अडीअडचणी बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी  उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती शुभांगी भारदे, साक्री पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वाय. डी. शिंदे, धुळे मध्यम प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता  भदाणे, अक्कलपाडा प्रकल्प विभागाचे सहाय्यक अभियंता पी. जी. पाटील, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभागाचे उप अभियंता के. सी. कुवर, वाडी-शेवाडी ता. शिंदखेडा प्रकल्प उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 आर. पी. गरूड,  साक्री नायब तहसिलदार व्ही. डी. ठाकूर, पुनर्वसन तालुका समितीचे अध्यक्ष सुभाष काकुस्ते, तामसवाडीचे सरपंच मधुकर अहिरे आदी उपस्थित होते.
             जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, पाणी पुरवठा योजना पूर्ण केल्यानंतर प्रकल्प यंत्रणेने योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्याव्यात.   तसेच वाढीव वस्तीमध्ये पुरक पाणी पुरवठा योजना करण्यासाठी ग्रामपंचायतीने कृती आराखडयात या योजनांचा समावेश करावा, असेही सांगितले. 
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या विविध निवाडयातील कलम 18 व कलम 28 अ अंतर्गत मागणी मोठया कालावधीपासून प्रलंबित आहे.  याबाबत जून व जुलै-2015 मध्ये   14 कोटी 55 लाख रूपये न्यायालयात जमा  करण्यात आलेली असून उर्वरित रक्कमा तातडीने प्राप्त होण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून निधी  मिळण्यासाठी संबंधितांनी पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.
            सैय्यदनगर या पुनर्वसित गावठाणात स्थलांतरीत करणे हे उद्दिष्ट निश्चित करून  जिल्हा परिषद, धुळे पाटबंधारे विभाग, पुनर्वसन विभाग, महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या सर्व यंत्रणांनी  समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी दिल्या.
            ते पुढे म्हणाले की, तामसवाडी, वसमार, सैय्यदनगर या गावातील वैयक्तिक शौचालयांच्या बाबतीत त्वरित निर्णय घ्यावा व पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.  पूर्ण होणाऱ्या नागरी सुविधा ग्राम पंचायतीने ताब्यात घेऊन पुढील विकास कामे जिल्हा परिषदेमार्फत प्राप्त होणाऱ्या निधीमधून करण्यात यावी,असेही त्यांनी सांगितले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा