रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

पिण्याच्या पाण्याचा प्राधान्याने विचार करून चाऱ्याचे नियोजन करावे -पालकमंत्री दादाजी भुसे



             धुळे, दि. 16 :- पिण्याच्या पाण्यास प्राधान्य देऊन ते राखून ठेवले पाहिजे, गुरांसाठी चाऱ्याचे नियोजन  करावे त्याचबरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयोच्या माध्यमातून यंत्रणांनी मजुरांना सेल्फवरील कामे उपलब्ध करून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
           पाणी टंचाई, म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो, शेतीकर्ज पुनर्गठन जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली काल  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सरला पाटील, आमदार अनिल अण्णा गोटे (धुळे), कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजीराव दहिते, आरोग्य सभापती मधुकर गर्दे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, महानगरपालिका आयुक्त डॉ.नामदेव भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी भारदे, श्रीमती हेमांगी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, तहसिलदार दत्ता शेजूळ, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती व्ही. एन. देवरे, नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक अरविंद बोरसे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे, जिल्हा उपनिबंधक रामेंद्रकुमार जोशी, लघुसिंचन विभाग (जलसंधारण विभाग) कार्यकारी अभियंता बी. व्ही. देसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय भदाणे, कार्यकारी अभियंता (रोहयो) अनिल पवार, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
            पालकमंत्री दादाजी भुसे  म्हणाले, खरीप हंगामात पेरणीनंतर पावसात खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना   दुबार पेरणी करण्याची आवश्यकता असल्यास त्याबाबतचा अहवाल कृषि विभागाने एका आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा.  जिल्ह्यात गुरांसाठी चारा उपलब्ध राहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन चाऱ्याची माहिती घेऊन पुढील नियोजन करण्याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना पालक मंत्री म्हणाले, जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या तसेच होणाऱ्या कामांची माहिती ग्रामस्थांपासून सरपंच, आमदार, खासदार आदी मान्यवरांपर्यंत द्यावी.  जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असून त्यात लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी आमदार अनिल गोटे म्हणाले, जनावरांना चारा मुबलक मिळण्यासाठी हायड्रोफ्लोरीक सिस्टीमचे तंत्रज्ञान राज्यात उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.  हे तंत्रज्ञान विकसित केल्यास जनावरांचे आजार कमी होतील, दुग्ध उत्पादन वाढीस मदत मिळेल.  हे तंत्रज्ञान नॉर्वे, स्विडन, इस्त्रायल देशात चांगल्या प्रकारे विकसीत  करण्यात आले  आहे.
आमदार कुणाल पाटील, जि.प. उपाध्यक्ष शिवाजी दहिते, आरोग्य सभापती मधुकर गर्दे  यांनी 
सांगितले की,  खरीप पिकांच्या पेरणीनंतर पावसात खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी अनुदान उपलब्ध  होणे आवश्यक होते.  जिल्ह्यात जनावरांसाठी उपलब्ध असणारा चारा आणि त्याचे योग्य नियोजन करण्याची  आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ  म्हणाले, जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरणीनंतर पावसात खंड पडल्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम झालेला असून एकरी उत्पन्न कमी येण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याचा साठा, पाणी पुरवठा, चाऱ्याची उपलब्धता, खरीप 2014 व गारपीट अनुदान आदींची माहिती देऊन जिल्ह्यात बँकांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पीक कर्ज वाटप करून चांगले काम केलेले आहे.  शेतकऱ्यांनी पीक विमा घेतल्यास नैसर्गिक आपत्तीवर त्यांना धैर्याने सामोरे जाता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच आतापर्यंत जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचे मुल्यांकन दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले असून  यापुढे देखील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गुणवत्ता पूर्ण कामे झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी  सांगितले.
            बैठकीचे सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी केले.
0000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा