धुळे, दि. 16
:- शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून
जिल्ह्यात मंडळ निहाय महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून त्याचा
जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
साक्री तालुक्यातील पिंपळपाडा खु.
येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान
योजना व दाखले वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली
आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते
बोलत होते. यावेळी आमदार डी. एस. अहिरे,
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, साक्री पंचायत समितीच्या सभापती श्रीमती ताराबाई
बहिरम, हिलाल माळी, उपविभागीय अधिकारी
विठ्ठल सोनवणे, तहसिलदार माणिक आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. एन.
पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बी. एम. पाटील,
नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक अरविंद बोरसे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस.
ईखारे, ग्राम पंचायत सरपंच श्रीमती झेलुबाई बागुल, पिंपळगाव आश्रमशाळेचे अध्यक्ष
त्र्यंबक सोनवणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, अधिकारी,
कर्मचारी, पंचक्रोशितील नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, महाराजस्व अभियानांतर्गत शासन जनतेच्या
दरबारात जाऊन लोकांपर्यंत पोहचत आहे. या अभियानातंर्गत 2,859 लाभार्थ्यांना लाभ
होत आहे. अधिकाऱ्यांनी जनतेची कामे
सहजरित्या करण्यासाठी प्राधान्य द्यावे.
यापूर्वी दाखले, शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, सातबारा उतारे आदींसाठी
नागरिकांची, विद्यार्थ्यांची झुंबड राहत असे.
यासाठी नागरिकांना जाण्या-येण्याचा खर्च, वेळही मोठ्या प्रमाणात लागत
असे.
पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवार
अभियानांतर्गत होत असलेल्या बंधाऱ्यांचा उपक्रम चांगला आहे. या बंधाऱ्यातून शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक
पाणी उपलब्ध होऊन पिकांच्या उत्पादनात निश्चित वाढ होणार आहे आणि शेतकरी सक्षम होऊन देश प्रगतीपथावर
राहण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी
अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे महसूल विभागांतर्गत
कार्यालयांकडे असलेले दैनंदिन प्रश्न तत्पर निकालात काढणे आणि महसूल प्रशासन अधिक
लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्याच्या दृष्टीने राज्यात दि. 1 ऑगस्ट, 2015
पासून महाराजस्व अभियान हा महात्वाकांक्षी
उपक्रम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
महाराजस्व अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी महिन्यातील विशिष्ट
दिवस निश्चित करून मंडळ स्तरावर अथवा तालुकास्तरावर एकत्र येऊन जनतेच्या
समस्यांचे निराकरण करण्यासाठी विस्तारीत
समाधान योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
आमदार
डी. एस. अहिरे यांनी महाराजस्व अभियानातून आवश्यक दाखले घरपोच मिळण्याची सोय शासनाने
उपलब्ध करून दिलेली आहे तसेच जलयुक्त शिवार अभियानातून शेतीला सिंचनासाठी पाण्याची
उपलब्धता होणार आहे याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे सांगितले. प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी विठ्ठल
सोनवणे यांनी महाराजस्व अभियानाची माहिती दिली.
मान्यवरांच्या हस्ते यावेळी
शिधापत्रिका, सातबारा उतारा, जातीचा दाखला लाभार्थ्यांना वितरीत करण्यात
आले. कार्यक्रमाचे शेवटी तहसिलदार माणिक आहेर यांनी सर्व मान्यवरांचे आणि
उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एन. बिरारी यांनी केले.
वृक्षारोपण
यावेळी सामाजिक
वनिकरण वनविभागाच्या वतीने पिंपळपाडा खु. आश्रमशाळेच्या परिसरात मान्यवरांच्या
हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा