शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५

मागासवर्गातील युवकांना स्वयंरोजगारासाठी महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाचे अर्थसहाय्य

मुंबई,दि.21 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने अनुसूचित जातीतील युवकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य मिळावे, यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.
अनुसूचित जातीतील नवबौद्ध, महार, बुरुड, खाटीक, मेघवाल, रुखी, वाल्मिकी, मेहतर आदी समाजातील युवकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने 50 टक्के अनुदान योजना, प्रशिक्षण योजना, बीज भांडवल योजना या योजना सुरू केल्या आहेत.
यातील 50 टक्के अनुदान योजनेत प्रकल्प मर्यादा 50 हजार असून प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येते. तर उर्वरित रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. तर प्रशिक्षण योजनेमध्ये व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य मिळविण्यासाठी व तांत्रिक व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध व्यावसायिक ट्रेडचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
बीज भांडवल योजनेमध्ये प्रकल्पाची मर्यादा 50 हजार ते पाच लाख रुपयापर्यंत असून प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बीज भांडवल कर्ज 4 टक्के द.सा.द.शे. व्याज दराने महामंडळामार्फत देण्यात येते. यामध्ये महामंडळाच्या दहा हजार रुपयांच्या अनुदानाचा समावेश आहे. तसेच बँकेचे 75 टक्के कर्ज देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी महामंडळाच्या मुंबई शहर/उपनगर जिल्हा कार्यालय, रुम नं.35, गृहनिर्माण भवन, तळमजला, कलानगर, बाद्रा (पू.) मुंबई – 400051, दूरध्वनी क्र. (022) 26592640 या पत्त्यावर संपर्क साधावा.

०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा