सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५

शेतकरी व सामान्य जनतेचे प्रश्न त्वरित सोडवणार - जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ



धुळे, दि. 22 :-   सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर त्यांचा दैनंदिन कामकाज व विहित प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांशी नियमीत संबंध येतो.  शेतकरी व सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या दृष्टीने व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज दिली.
            शिरपूर तालुक्यातील काकडमाळ या अतिदुर्गम गावात महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान योजनेच्या आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ बोलत होते.  यावेळी आमदार काशिराम पावरा, उप विभागीय अधिकारी राहूल पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बी. एम. पाटील, तहसिलदार नितीन पाटील, तालुका कृषि अधिकारी गिरासे, महावितरणचे नेमाडे, शिरपूर तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 
             यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, सर्वसामान्य जनतेला शैक्षणिक व अन्य कामांकरिता विविध दाखल्यांची आवश्यकता असते. या सर्व दाखल्यांची प्रक्रिया सुकर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना लागणाऱ्या प्रमाणपत्राकरिता सहामाही, वार्षिक परीक्षेच्या पूर्वी  व सुटीच्या दिवशी तसेच सर्वसाधारण जनतेस आवश्यक दाखल्यांसाठी जनतेच्या सोयीसाठी मध्यवर्ती  ठिकाणी  अशा प्रकारचे कार्यक्रम  आयोजित करून त्याठिकाणी दाखल्यांकरिता आवश्यक ते अर्ज व कागदपत्रे याबाबतची माहिती जनतेस देऊन  त्याच ठिकाणी अर्ज भरून तात्काळ दाखले निर्गमित करण्यात येतील. विस्तरीत समाधान योजने अंतर्गत विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत  विशिष्ट दिवशी ग्राम व मंडळ स्थरावर एकत्र येऊन जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
            काकडमाळ सारख्या अतिदुर्गम भागात विस्तारीत समाधान योजनेचे शिबिर घेऊन आरोग्य तपासणी, पशुवैद्यकीय तपासणी, विविध उपयोगी प्रमाणपत्रांचे वाटप, आधारकार्ड, शिधापत्रिकांचे वाटप यासारखे उपक्रम घेतल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून आमदार काशिराम पावरा यांनी परिसरातील रस्ते, वीज, आरोग्य यासारख्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाव, पाडयांचा समावेश करण्याची सूचना यावेळी  केली.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहूल पाटील यांनी केले.  महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती यावेळी तहसिलदार नितीन पाटील यांनी दिली. 

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा