मंगळवार, २५ ऑगस्ट, २०१५

सफाई कर्मचारी आयोगाचे लवकरच पुनर्गठन - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले

मुंबई, दि. 24 : सफाई कर्मचारी आयोगाचे लवकरच पुनर्गठन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिली.
राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात सामाजिक न्याय मंत्री श्री. बडोले यांच्या मंत्रालयातील दालनात आज बैठक झाली. त्यावेळी श्री. बडोले यांनी हे निर्देश दिले. यावेळी समाज कल्याण आयुक्त रणजितसिंह देओल, सामाजिक न्याय विभागाच्या सहसचिव श्रीमती रानडे, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नागेज कंडारे, कार्याध्यक्ष डॉ. रेखा बहनवाल यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. 
सामाजिक न्याय मंत्री श्री. बडोले म्हणाले की, साफसफाईची कामे तसेच स्वच्छतागृहाच्या देखभाल दुरुस्तीची कामे सफाई कामगार समाजाच्या व्यक्तीला देण्याबाबत लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल. तसेच सफाई कर्मचाऱ्यांना विशेष आरोग्य भत्ता, कर्मचाऱ्यांचा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश, शैक्षणिक अर्हता असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना वर्ग 3 मध्ये नियुक्ती करण्यासंदर्भातील परिपत्रकामध्ये दुरुस्ती या मागण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात येईल.
सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्ट्या देण्याबाबतचे परिपत्रक लवकरच काढण्यात येईल. शासकीय व निमशासकीय सेवेतील सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत आणि प्रथम करण्यात यावेत, यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री श्री. बडोले यांनी यावेळी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा