धुळे, दि. 25
:- जिल्ह्यात आजपावेतो सरासरी 55 टक्के पाऊस झाला असून गेले 15 दिवस पाऊस पडलेला
नाही. अशा परिस्थितीत संभाव्य पाणी
टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून प्रत्येक तालुका स्तरावरून
गांवनिहाय सूक्ष्म आराखडा तयार करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची
माहिती जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या “सातपुडा” सभागृहात पिण्याच्या पाण्याकरिता धरणातील पाणीसाठा राखून ठेवण्याबाबत आयोजित
करण्यात आलेल्या संबंधित यंत्रणांच्या बैठकीत बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मिसाळ बोलत
होते. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी
उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपसंरक्षक एस. जी. हलमारे, जिल्हा अधीक्षक कृषि
अधिकारी डॉ.बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा
नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी
(ग्राम पंचायत) बी. ए. बोटे, धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी.
वाघ, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. पी.
वाघ,मध्यम प्रकल्प विभाग क्र. 1 चे उप कार्यकारी अभियंता एस. के. भदाणे, उप
विभागीय अधिकारी राहूल पाटील (शिरपूर) जे. आर. वळवी (धुळे), तहसिलदार दत्ता शेजूळ
(धुळे) नितीन पाटील (शिरपूर), माणिक आहेर
(साक्री), पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी
आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी
म्हणाले, टंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च महत्व असून
त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तसेच महानगरपालिका व
नगरपालिका यांच्या पाणी पुरवठा विभागाने गांवनिहाय व प्रभागनिहाय टंचाईचा सूक्ष्म
आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील
पर्जन्यमानाची परिस्थिती अशीच राहिल्यास
ऑक्टोबर-15 नंतर टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील मोठया व लघु
जलस्त्रोतांचे पाणी आरक्षित करणे गरजेचे आहे.
त्यादृष्टीकोनातून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका
यांनी आपल्या कार्यक्षेत्रात लागणाऱ्या संभाव्य जलसाठ्यांचे पाणी आरक्षित करण्याचे
प्रस्ताव जिल्हा प्रशासनास तात्काळ सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री.
अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी दिल्या.
जुलै-2016
पर्यंत पुरेल एवढ्या जलसाठ्याची आवश्यकता असून ही आवश्यकता लक्षात घेऊन
जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठया धरणांच्या पात्रात असलेल्या जीवंत पाण्याच्या
साठयाचे नियोजन करणे आवश्यक आहे. सदरचे
नियोजन करत असतांना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या व शेतकऱ्यांच्या समन्वयानेच हे नियोजन करावे. जिल्ह्यातील 10 धरणांमधील आजच्या उपयुक्त
साठ्याची टक्केवारी एकूण 27.90 टक्के इतकी असून त्यातील पांझरा-57.31 टक्के,
मालनगांव-75.38 टक्के, जामखेडी-100 टक्के, बुराई-13.8 टक्के, करवंद-87.68 टक्के,
अनेर-41.93 टक्के, वाडी शेवाडी-0.14 टक्के इतकी असून कनोली, सोनवद व अक्कलपाडा
येथील पाणीसाठ्याची टक्केवारी निरंक असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी
अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.
महानगरपालिकेने
संभाव्य टंचाईचा आराखडा तयार करतांना ऑक्टोबर-2015 अखेर महानगरपालिकेच्या
क्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या संभाव्य ग्रामपंचायतींचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन
करणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात
वारूड ता. शिंदखेडा व धामणदर-पारगांव ता. साक्री या दोन ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात
असून 37 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.
कुंडाणे, वेल्हाणे व वलवाडी या
गावांनीही टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महानगरपालिका व
नगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी धुळे शहराला पाणी पुरवठा
करणाऱ्या तापी उद्भवचा प्रवाह सुरू असून नकाणे तलावात 90 द.ल. घ.फू. म्हणजे 25
टक्के, डेडरगाव तलाव-51 द.ल.घ.फू. (42 टक्के), शिरपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या
करवंद धरणात-16.01 द.ल.घ.फू. (87.68 टक्के) तसेच दोंडाईचा शहराला पाणी पुरवठा
करणाऱ्या तापी-सारंगखेडा बॅरेजच्या पाण्याची पातळी 112.80 मीटर इतकी असून 1,601.18
क्युमेक्स पाण्याचा विसर्ग आहे. तर
शिंदखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी-सुलवाडे बॅरेजच्या पाण्याची पातळी
123.70 मीटर इतकी असून 1,440.50 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग असल्याची माहिती यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व धरणांचे पाणी मिळून
सध्या जिल्ह्यात 4 हजार 834 द. ल. घ.फू. साठा असून 3 कोटी 28 लाख द.ल.घ.फू. पाणी
साठयाची क्षमता सर्व धरणांची आहे.
जिल्ह्यातील पशुधनासह 22 लाख लोकसंख्येला दर दिवशी 140 लिटर याप्रमाणे 257
दिवस पुरेल एवढा पाणी साठा सध्या जिल्ह्यात शिल्लक असल्याची माहिती धुळे पाटबंधारे
विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. वाघ यांनी यावेळी दिली.
दृष्टीक्षेपात संभाव्य टंचाई...
·
जिल्ह्यात आजपावेतो सरासरी 55
टक्के इतका पाऊस.
·
असेच पर्जन्यमान राहिल्यास
ऑक्टोबर-2015 अखेर जाणवणार टंचाई.
·
जुलै-2016 पर्यंत पुरेल इतक्या
पिण्याच्या पाण्याचे करणार नियोजन.
·
जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण
27.90 टक्के पाणी.
·
कनोली, सोनवद व अक्कलपाडा येथील
पाणी साठा निरंक.
·
जिल्ह्यात दोन ठिकाणी टँकरद्वारे
पाणी पुरवठा, 37 विहिरींचे अधिग्रहण.
·
कुंडाणे, वेल्हाणे व वलवाडी
(ता.धुळे) गावांनी टँकरद्वारे पाणी
पुरवण्याची केली मागणी.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा