मंगळवार, २५ ऑगस्ट, २०१५

राज्यात सरासरीच्या 58 टक्के पाऊस, 48 टक्के पाणीसाठा, 93टक्के क्षेत्रावर पेरणी

राज्याच्या सर्वच भागात तुरळक पावसाने हजेरी लावली असून मराठवाडा विभागात पाणी टंचाई जाणवत आहे.  राज्यात आजपर्यंत 497 मि.मी. पाऊस झाला असून तो 861 या सरासरीच्या 57.7 टक्के आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 93 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जलाशयातील सर्व प्रकल्पांत 48 टक्के एवढा साठा आहे. 
राज्यात सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे-नागपूर व अमरावती जिल्ह्यात 100 टक्के पेक्षा अधिक पाऊस झाला असून नंदूरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, भंडारा या सहा जिल्ह्यांत 76 ते 100 टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, नांदेड हिंगोली, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 19 जिल्ह्यांमध्ये 51 ते 75 टक्के पावसाची नोंद झाली असून नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी या सात जिल्ह्यात 26 ते 50 टक्के पाऊस पडला आहे.
राज्यातील 355 तालुक्यांपैकी पाच तालुक्यात सरासरीच्या तुलनेत 0 ते 25 टक्के, 9७ तालुक्यात 26 ते 50 टक्के, 150 तालुक्यात 51 ते 75 टक्के, 70 तालुक्यात 76 ते 100 टक्के आणि 33 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 
राज्यात 93 टक्के क्षेत्रावर पेरणी
राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 134.70 लाख हेक्टर असून 21 ऑगस्ट अखेर 124.70 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 93 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
राज्यात कोकण, पुणे व कोल्हापूर विभागाच्या पश्चिम घाट भागात भात व नागली पिकांच्या पुनर्लागवडीची कामे अंतिम टप्प्यात असून, नागपूर विभागात भात पिकाच्या पुनर्लागवडीचे काम प्रगतीपथावर आहे. खरीप ज्वारी व बाजरी पिके पोटरी अवस्थेत, मका व तूर पिके वाढीच्या तर उडिद, मुग व सोयाबीन पिके फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहेत. कापूस पिक पाते धरणे ते फुलोरा अवस्थेत आहेत.  पिकांच्या पुढील वाढीसाठी पुरेशा पावसाची नितांत आवश्यकता आहे.
 खरीपासाठी हंगामातील अपेक्षित क्षेत्र, मागील 3 वर्षांची सरासरी आणि बियाणे बदल यानुसार पिकनिहाय बियाण्यांची गरज निश्चित करण्यात आली आहे. खरीपाकरिता 16.64 लाख क्विंटल बियाण्यांची गरज होती, त्या तुलनेत 17.11 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. दि. 21 ऑगस्ट अखेर 14.99 लाख क्विंटल (90 टक्के) इतका बियाणे पुरवठा झाला आहे.
धरणात 48 टक्के पाणी साठा
राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांत 48 टक्के साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास 62 टक्के पाणी साठा होता. जलाशयातील विभागनिहाय आजचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणे-
मराठवाडा-8 टक्के (19), कोकण-82 टक्के (89), नागपूर-70 टक्के (65),  अमरावती-61 टक्के (48), नाशिक-41टक्के (58) आणि पुणे-50 टक्के (78), इतर धरणे-69 टक्के (89) असा पाणीसाठा आहे. 
एकोणिसशे गावांना टँकरने पाणी पुरवठा
     राज्यातील 1501 गावे आणि 2677 वाड्यांना आजमितीस 1901 टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी याच सुमारास 1524 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता.
रोहयोच्या कामावर 93 हजार मजूर

     महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात 15 ऑगस्टपर्यंत 12 हजार 643 कामे सुरू असून या कामांवर 92 हजार 908 मजुरांची उपस्थिती आहे. राज्यात 4 लाख 38 हजार 695 कामे शेल्फवर असून त्या कामांची मजूर क्षमता 1294.27 लाख एवढी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा