नाशिक, दि.4 – अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर
येथील सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवासी सेवेचा अविरत ध्यास घेतलेली राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘एसटी’ सिंहस्थ कुंभमेळ्यात
भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. तीन हजार बसेस त्यासाठी सहा हजारपेक्षा अधिक चालक-वाहक,
आपत्कालिन परिस्थितीतील दुरुस्ती यंत्रणा, नूतनीकरण केलेली बसस्थानके, प्रवाशांच्या
माहितीसाठी अद्ययावत ‘माहिती कक्ष’, नाममात्र दरात ‘पर्वणी पासेस’ अशा विविध सुविधा
‘एस.टी.’ ने उपलब्ध करुन दिल्या आहेत.
एस.टी.च्या
माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगली सुविधा मिळावी यासाठी तीन हजार बसेसचे नियोजन करण्यात
आले असून या बसेसकरिता सहा हजारपेक्षा अधिक वाहक-चालक, पर्यवेक्षक, कर्मचारी नेमण्यात
येणार आहेत. पर्वणीकाळात प्रत्येक बस दर 8-10 तासात स्वच्छ होईल यावरही महामंडळाचा
विशेष भर राहणार असून हरितकुंभाची संकल्पना ध्यानात घेऊन बसस्थानकांच्या स्वच्छतेवरही
लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक बाह्य वाहनतळावर बस दुरुस्तीची कार्यशाळा आवश्यक
त्या यंत्रांसह कार्यन्वित केली जाणार असून याच ठिकाणी कर्मचाऱ्यांना विश्रांती कक्ष,
शुद्ध पाणी, स्वच्च्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. नाशिकरोड आगाराचे
काम पूर्ण झाले असून महामार्ग बसस्थानकाचे तसेच त्र्यंबकेश्वर येथील जव्हार फाटा बसस्थानकाचेही
नूतनीकरण केले आहे. सात बसस्थानकांवर कायमस्वरुपी सीसीटीव्ही लावले आहेत.
पर्वणी काळात
एका दिवसासाठी 100 रुपये शुल्क भरुन पर्वणी पास प्रवाशांना घेता येईल. या पासद्वारे
दिवसभर नाशिक, त्र्यंबक शहरांतर्गत ठिकाणी तिकिट न काढता भाविकांना प्रवास करता येईल.
त्याशिवाय नाशिक, शिर्डी, सप्तश्रृंगीगड, भीमाशंकर आदी ठिकाणी जाण्यासाठी 847 रुपये
भरुन 4 दिवस प्रवासाचा पास देखील दिला जाणार आहे. राज्यातील सर्व बसस्थानकांवर हे पास
प्रवाशांना उपलब्ध होतील. धार्मिक, पर्यटनस्थळे पाहण्यासाठी 40-50 प्रवाशांच्या गटाने
जर एकत्र बसचे आरक्षण केल्यास लगेच बस पुरविण्यासाठी ‘कोठूनही कोठे’ प्रवास संकल्पना
कार्यन्वित केली जाणार आहे. प्रवासाच्या एक दिवस अगोदर राज्यात कुठल्याही आगारात हे आरक्षण करता येईल, असे विभागीय नियंत्रक श्रीमती
यामिनी जोशी यांनी सांगितले.
एस.टी. महामंडळाच्या
वतीने नाशिकरोडला ‘माहिती कक्ष’ कार्यन्वित करण्यात येणार असून 0253-2318308 या क्रमांकावर
कुठूनही संपर्क साधल्यास कुंभमेळ्याची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील
हरितकुंभ संकल्पनेबद्दल जनजागृतीसाठी पोपटी रंगाच्या नव्या 200 बसेस रस्त्यावर धावत
असून प्रवाशांसाठी त्या आकर्षण बिंदू ठरल्या आहेत. कुंभमेळ्यात सेवाभावी परंपरा आणि
सूक्ष्म नियोजनातून प्रवाशांना सुखद धक्का देऊन ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद सार्थ
ठरविण्यासाठी एस.टी. ने सूक्ष्म नियोजन केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा