शनिवार, ७ जानेवारी, २०१२

विशेष अपील निर्गत कार्यक्रमांतर्गत 600 पैकी 457 अपिले निकाली --विजय कुवळेकर


मुंबई. दि. 6: राज्याच्या मुख्य माहिती आयोगाकडील अपिलांचे वाढते प्रमाण लक्षात घेता दीर्घ काळ प्रलंबित असलेली अपिले निकाली काढण्याच्या उद्देशाने राज्याच्या मुख्य माहिती आयोगाने विशेष अपील  निर्गत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दि. 3 जानेवारी ते 6 जानेवारी 2012 या कालावधीत 607 अपीले विचारात घेण्यात आली. त्यामध्ये 457 अपिले निकाली निघाली असल्याचे म्हणजेच जवळपास 75 टक्के अपिले निकाली निघाली असल्याचे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांनी सांगितले.
            राज्यात मुख्य माहिती आयोगाकडे जवळपास 19 हजार अपिले प्रलंबित असल्याचे सांगून       श्री. कुवळेकर म्हणाले की नियमित पद्धतीने या अपिलांवर कार्यवाही करण्यासाठी अंदाजे दोन ते तीन वर्षे लागतील. शिवाय ही अपिले निकाली काढेपर्यंत आणखी काही हजार अपिले दाखल होण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर प्रलंबित अपिलांचा लवकरात लवकर निपटारा करून लोकांची न्याय मिळविण्याची प्रक्रिया ज्या माहितीवर आधारित आहे ती माहिती त्यांना वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक ठरते. ही बाब लक्षात घेऊन या विशेष अपिल निर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून  अपिलकर्ता, जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांच्यात सुसंवाद घडवून आणल्याने, त्यांना एकत्र आणून चर्चेच्या माध्यमातून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केल्याने बरेच प्रश्न सुटण्यास मदत  झाल्याचे दिसून आले. तसेच अपिलकर्ता आणि जनमाहिती अधिकारी या दोघांच्या मानसिकतेत बदल घडून आल्याचेही त्यांनी सांगितले.
            मुंबईत अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. परंतू यापूर्वी पुण्यामध्ये माहिती आयोगाने अशा कार्यक्रमातून अपिले निकाली काढल्याने प्रलंबित अपिलांचे प्रमाण खुप कमी होण्यास मदत झाली असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, या तीन दिवसाच्या कार्यक्रमात जी 607 अपिले विचारार्थ ठेवण्यात आली होती ती नियमित पद्धतीने विचारार्थ घेतली असती तर किमान तीन ते चार महिने लागले असते. ती चर्चेतून आणि सुसंवादातून फक्त तीन दिवसात निकाली निघाली हे या कार्यक्रमाचे यश आहे. गेल्यावर्षी दिल्ली येथे सर्व राज्यांच्या मुख्य माहिती आयुक्तांची परिषद बोलविण्यात आली होती. त्या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील या विशेष अपिल निर्गत कार्यक्रमाची माहिती देण्यात आल्यानंतर अनेक राज्यांनी उत्सुकतेने या कार्यक्रमाची माहिती जाणून घेतली व आपल्या राज्यात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. पुण्यात झालेल्या अशा कार्यक्रमात हरियाणाचे मुख्य माहिती आयुक्त तर आत्ता मुंबईत झालेल्या तीन दिवसांच्या कार्यक्रमात गुजरातचे मुख्य माहिती आयुक्त डी. राजगोपालन यांनी स्वत: उपस्थित राहून कार्यक्रमाची पाहणी केली तसेच अशा प्रकारचा कार्यक्रम गुजरात मध्ये घेण्याचा मानस व्यक्त केला असल्याची माहितीही श्री. कुवळेकर यांनी यावेळी दिली.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा