बुधवार, ११ जानेवारी, २०१२

दक्षिण आफ्रिकेतील गौटांग प्रांताच्या शिष्टमंडळाची विधानभवनास भेट


         मुंबई, दि. 10 : दक्षिण आफ्रिकेतील गौटांग प्रांताच्या विधिमंडळ सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांची विधानभवनात भेट घेतली आणि विधिमंडळाचे कामकाज व येथील विविध समित्यांबाबत माहिती जाणून घेतली.
          गौटांगच्या उपविधान समितीच्या अध्यक्षा श्रीमती रेफिलवे लेटवाबा यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यांचे शिष्टमंडळ सध्या मुंबईभेटीवर आले असून विधान भवनात झालेल्या या अभ्यास भेटीप्रसंगी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष गिरिष बापट, सह सचिव भाऊसाहेब कांबळे, उप सचिव महेंद्र काज हेही उपस्थित होते. दोन्ही देशांमधील विधानमंडळांची समिती पध्दती, उपविधान समित्यांची कार्यकक्षा, वित्तीय समित्यांची विधानकार्यातील महत्वपूर्ण भूमिका आणि दक्षिण आफ्रिका भारताचे मैत्रीपूर्ण संबंध या विषयावर यावेळी वैचारिक आदानप्रदान झाले.
          राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या सत्याग्रह आणि अहिंसावादी चळवळीचा शुभारंभ दक्षिण आफ्रिकेतूनच केला होता.  महात्मा गांधीजींच्या विचारांवर श्रध्दा असणारा फार मोठा वर्ग दक्षिण आफ्रिकेत आहे. दक्षिण आफ्रिकेचे ज्येष्ठ नेते नेल्सन मंडेला यांच्या विषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात तितकाच नितांत आदर आहे, अशा शब्दात विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी उभय देशांतील परस्पर स्नेहसंबंध अधोरेखित केले.
          विरोधी पक्षनेते विनोद तावडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष गिरिष बापट यांनीही यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतांना महाराष्ट्र विधानमंडळाच्या दैदिप्यमान वाटचालीविषयी शिष्टमंडळ सदस्यांना माहिती दिली.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा