बुधवार, २५ जानेवारी, २०१२

अभिमान ! मतदार असल्याचा. . .


लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या प्रक्रियेत निर्भयमुक्त वातावरणात पार पडणाऱ्या निवडणुका आणि मतदारांचे मत या दोन्ही गोष्टींना अनन्य साधारण असं महत्व आहे. एकीकडे आपल्या आवडीचा सक्षम नेता निवडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमातून मतदारांना मिळत असतांना दुसरीकडे सशक्त लोकशाहीची पायाभरणी होत असते. ही एकप्रकारे  आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची एक चांगली गुंतवणूक देखील मानली जाते. त्यामुळे मतदार असल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगायला हवा आणि ज्या ज्या स्तरावर म्हणजे विधानसभा-लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या ज्या वेळी होतात तेव्हा आपला हा मौल्यवान अधिकार बजावायला हवा.
            राज्याचे मुख्य निवडणुक  अधिकारी कार्यालय 25 जानेवारी 2012 ला दुसरा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करते आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाचा मुलभूत अधिकार बजावण्याचे आवाहन करणारी, जन प्रबोधन करणारी प्रत्येक बाब लक्षवेधी ठरणार आहे.
            निवडणूका आल्या की मतदारयादीत नाव नसणं, नावात- रहिवाशी पत्त्यात चुका असणं किंवा बदल     झालेला असणं, छायाचित्र ओळखपत्र नसणं यासारख्या अनेक तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात. पण त्यासाठी मतदार म्हणून आपण स्वत: किती दक्ष असतो, आपल्या नावातील- पत्त्यातील बदल, सुधारणा करून घेण्यास आपण किती प्रयत्न करतो हे समजून घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच आपण पात्र असताना मतदानाचा हक्क बजावणं ही.  जी व्यक्ती वयाची 18 वर्षे पूर्ण करते त्या व्यक्तीला मतदानाचा मुलभूत हक्क प्राप्त झाला आहे. पण या मुलभूत हक्काची आपण कितीजण अंमलबजावणी करतो ? हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. मतदानाच्या टक्केवारीवरून हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.
            आपल मत- आपला हक्क - आपलं मतदान केंद्र याबाबतीत जागरूक राहताना मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावं, मतदानाचा मुलभूत अधिकार बजावावा आणि मतदानाला न जाण्याची आणि मतदान न करण्याची उदासीनता मनातून काढून टाकावी यासाठी विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती केली जात असते.
            तरूणांना आपण देशाचा आधारस्तंभ मानतो. याच आधारस्तंभाने पुढे येऊन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं, समृद्ध, सशक्त लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक वर्षी 25 जानेवारी  हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.  लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिला आणि युवकांचे मतदानाचे प्रमाण वाढावे, त्यांनी पुढे येऊन निर्भयपणे आपला मतदानाचा आणि घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा वापर करावा या उद्देशाने या कार्यक्रमात महिला आणि युवकांना समोर ठेऊन विशेष जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
            दि. 25 जानेवारी 2012 रोजी नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर हॉलमध्ये सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय मतदार दिवसाच्या राज्य स्तरीय  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव
थँक्सी थेकेकरा, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वंदना कृष्णा उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
            राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यादृष्टीने एक विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.  मतदार असल्याचा अभिमान- मतदानासाठी सज्ज, जागृत मतदार, समृद्ध लोकशाहीचा आधार, तुमचे मत- तुमची निर्णयशक्ती, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा सहभाग अशा प्रोत्साहनात्मक स्वरूपात मोहीम राबविण्यात येत असून निवडणूक प्रक्रियेत सक्रिय योगदान देण्याबद्दल, सहभागी होण्याबद्दल आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विविध प्रसार माध्यमांचा उपयोगही करून घेण्यात आला आहे. 18 ते 19 वयोगटातील मतदारांना त्यांनी त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी एक विशेष मोहीम देखील या निमित्ताने हाती  घेण्यात आली आहे. 
            ज्या मतदाराचा जन्मदिनांक 1 जानेवारी 1992 ते 1 जानेवारी 1994 या दरम्यान आहे,  अशा 18 ते 19  या वयोगटातील मतदारांना, त्यांचे नाव मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची  विशेष संधी यानिमित्ताने मिळणार असून त्यासाठी त्याने  मतदार नोंदणीचा नमुना अर्ज क्रमांक 6,  रंगीत छायाचित्रासह मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी यांच्या कार्यालयात द्यावयाचा आहे.  ज्या पात्र तरुण नागरिकांनी  अद्याप त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवले नसेल त्यांनी त्वरित मतदार नोंदणी करावी  आणि दि. 25 जानेवारी 2012 या ‘¸üÖ™ÒüßµÖ मतदार פü¾ÖÃÖ’ कार्यक्रमात छायाचित्र मतदार ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन ही या निमित्ताने करण्यात आले आहे.
            राज्यात  आजमितीस एकूण 7 कोटी, 87 लाख, 21 हजार 472 नोंदणीकृत मतदार आहेत. यामध्ये 4 कोटी 14 लाख, 75 हजार 360 एवढे पुरुष तर 3 कोटी 72 लाख, 45 हजार 842 महिला मतदार आहेत. यापैकी   82.34 टक्के मतदारांना त्यांचे छायाचित्र ओळखपत्र वाटपाचे काम पूर्ण झाले आहे.
            राज्यात नव्याने सुमारे 19 लाख मतदारांची नाव नोंदणी झाली आहे. नव्याने नोंदणी झालेल्या 18 ते 19 वयोगटातील 5 लाख 50 हजार 386 युवक-युवतीना छायाचित्र ओळखपत्र तसेच मतदार दिन बिल्ला  वाटपाचे काम  प्रत्येक मतदान केंद्रावर केले जाणार आहे. यामध्ये 3 लाख 62 हजार 114 पुरुष तर 1 लाख 88 हजार 272 महिला मतदाराचा समावेश आहे.त्याचप्रमाणे नव्याने नोंदणी झालेल्या 20 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या एकूण 13 लाख 50 हजार 588 इतकी आहे. त्यांनाही यावेळी फोटो ओळखपत्र तसेच मतदार दिन बिल्ला वाटप केले जाणार आहे. यामध्ये पुरुष मतदार 7 लाख 47 हजार 043 तर महिला मतदार 6 लाख 03 हजार 545 इतक्या आहेत.
             दि. 25 जानेवारी 2012 रोजी एस. एन. डी. टी. महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात 20 युवतींना प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात छायाचित्र मतदार ओळखपत्र व मतदार दिन बिल्ला  सन्मानपूर्वक वितरित केला जाणार आहे.
मुख्य निवडणूक कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी विकसित केलेल्या http://ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरही  निवडणूक प्रक्रियेसंबंधीची माहिती आणि त्यासाठीचे अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले असून हे अर्ज भरुन ते संबंधित मतदारसंघातील यादीत नोंदविण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी, यांच्या कार्यालयात नेऊन देता येतील.
            राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आपण मतदार असल्याचा अभिमान बाळगून मतदानासाठी सज्ज राहतांना सुदृढ आणि सशक्त लोकशाही च्या निर्मितीमधील आपला सहभाग अधिक बळकट करुया. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा