मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१२

27 जिल्हा परिषदा आणि 305 पंचायत समित्यांसाठी आज मतदान


मुंबई, दि. 6 : राज्यातील 27 जिल्हा परिषदांच्या आणि 305 पंचायत समित्यांच्या जागांसाठी उद्या (ता. 7) मतदान होणार असून जिल्हा परिषेदेच्या 1,624 जागांसाठी 7,116; तर पंचायत समित्यांच्या 3,218 जागांसाठी 13,473 एवढे उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.
श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा आणि चामोर्शी, मुलचेरा या आठ पंचायत समित्या आणि तेथील जिल्हा परिषदेच्या गटांसाठी सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 या वेळेत मतदान होईल. अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या चार पंचायत समित्यांसाठी आणि तेथील जिल्हा परिषदेच्या गटांसाठी मात्र 12 फेब्रुवारी 2012 रोजी मतदान होणार आहे. एकूण 3,89,04,388 मतदार उद्या आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1,86,45,417 स्त्री; तर 2,02,58,971 पुरुष मतदारांचा समावेश आहे. त्यासाठी एकूण 59,914 मतदान केंद्र आणि सुमारे 1 लाख 38 हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यभरात सुमारे 7,000 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांसह गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षिततेसाठी अधिक काळजी घेण्यात आली असून पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान उद्या असले तरी सर्व ठिकाणची मतमोजणी 17 फेब्रुवारी 2012 होणार आहे, अशी माहितीही श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे. 

अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या प्रक्रियेत मतदार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्याला केंद्र स्थानी ठेऊन राज्य निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यास अधिकाधिक मतदारांनी प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात मतदानाचा आपला बहुमूल्य हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे.
0-0-0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा