मुंबई,िद. 28 : हातमाग आणि हस्तकलेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या अनेक कलाकुसरींनी भारतीय संस्कृती समृद्ध केली तर हातमाग हे देशाच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. त्यामुळे
हा वारसा जतन करणे गरजेचे आह, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी केले.
वांद्रे येथील रेक्लेमेशन मैदानात सुरु असलेल्या राष्ट्रीय हातमाग प्रदर्शन-2012 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाटेक्सचे अध्यक्ष ल. पु. चिंताकींदी, उपाध्यक्ष अ. ज. आसई, वस्त्रोद्योग संचालक आर. एन. शिनगारे, महाटेक्सचे कार्यकारी संचालक सु. ग. कुरसंगे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. खान यांनी यावेळी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सची पाहणी केली आणि हातमाग निर्मितीचे प्रात्यक्षिक पाहिले.
केंद्र शासनाचे विकास आयुक्त (हातमाग) यांचे कार्यालय व राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघाच्या (महाटेक्स) यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 18 मार्च पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातील विविध भागातील हातमाग संस्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. हे प्रदर्शन दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. सुट्टीच्या दिवशी मात्र हे प्रदर्शन दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहील.
देशभरातील गरीब विणकरांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करुण देणे, देशाच्या विविध भागातील हातमाग उत्पादने ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध करुन देणे तसेच हातमागाचे कपडे आणि डिझाईनविषयी जनजागृती करणे आदी विविध उद्दीष्टे या प्रदर्शनाच्या आयोजनामागे आहेत. प्रदर्शनात देशातील 14 राज्यांतील 75 संस्थांचे स्टॉल्स असून सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य महोत्सव आणि पारंपरिक हातमाग वस्त्रांचे फॅशन शो आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
देशभरातील नावांजलेली उत्पादने येथे पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी उपलब्ध
असून त्यात महाराष्ट्रातील येवल्याची पैठणी, नारायण पेठ कॉटन, नारायण पेठ सिल्क, इरकली सिल्क, सोलापूरी चादरी, पुणेरी साडी व ड्रेस मटेरिअल उपलब्ध आहेत तर उत्तर प्रदेशमधील झब्बा - पायजमा, चिकन साडी. मध्य प्रदेशमधील चंदेरी, माहेश्वरी साड्या, आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली, पटोला साड्या, तामिळनाडूतील सुंगडी, राजस्थानची बांधणी, कोलकत्त्याची कलकत्ता कॉटन तसेच सिल्क साडी, गुजराथमधील रजई, कोटा साडी, बिहारची टसर सिल्क साडी, शर्टींग, हरयाना-पानिपतच्या प्रिंटेड बेडशिट, ब्लँकेट, मणिपूरी शॉल, झब्बा, काश्मिरी पशमिना शॉल, दिल्लीचे वुलन व कॉटन कारपेट तसेच ओरीसी संबळपूरी सिल्क साडी, सिल्क ड्रेस मटेरीयल
इत्यादी दर्जेदार उत्पादने या प्रदर्शनात उपलब्ध आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा