सोमवार, १० ऑगस्ट, २०१५

कौशल्य वृध्दीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


            धुळे, दि. 10 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ज्या  कुटुंबांनी  100 दिवसांपेक्षा जास्त काम केले आहे.  अशा कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील  पात्र लाभार्थ्यांना कौशल्य वृध्दीसाठी शासनामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विविध कौशल्य वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रमांचा  लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज केले.
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कौशल्य वृध्दीसाठी उपक्रम राबविण्याकरिता  बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. एन. पाटील,  नाबार्ड सहाय्यक प्रबंधक अरविंद सोनवणे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक एस. एस. ईखारे, जिल्हा ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण केंद्राचे आर. पी. भदाणे, उपविभागीय कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अरविंद मोरे, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. नंदकिशोर चव्हाण,  गट विकास अधिकारी श्रीमती मोरे (धुळे), बी. एस. कोसोदे (शिरपूर)  वाय. डी. शिंदे (साक्री),  शिंदखेडयाचे विस्तार अधिकारी एस. एच. मोरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, कौशल्य वृध्दीसाठी  चारही तालुक्यातून 3,500 कुटुंबांचे सर्वेक्षण  करण्यात आले असून कौशल्य वृध्दीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.  यात कृषि विषयक बाबींमध्ये फळबाग, पॉली हाऊस, ठिबक सिंचन, शेडनेट, शेतीसंबंधी यंत्र चालवणे व त्यांची देखभाल दुरूस्ती तसेच बांधकाम विषयक व इतर 36 प्रकारच्या कुशल कामांचा समावेश आहे.  तसेच स्वयंरोजगारासाठी दुग्ध व्यवसाय, मत्स्य पालन, मेंढी पालन, मधुमक्षिका पालन, वाहन दुरूस्ती असे 5 स्वयंरोजगाराचे पर्याय उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.
       या बैठकीमध्ये कृषि विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नाबार्ड, जिल्हा ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा उद्योग केंद्र, आय. टी. आय., शासकीय तंत्र निकेतन यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्याबाबतचे नियोजन संबंधित यंत्रणांनी त्वरित सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा