शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

''माहिती संप्रेषण तंत्रज्ञान '' या विषयाचा 9 वी, 10 वीच्या माध्यमिक अभ्यासक्रमात समावेश


मुंबई, दि.29: माध्यमिक अभ्यासक्रमातील इ.9 वी,10 वीच्या अभ्यासक्रमात ``माहिती संप्रेषण तंत्रज्ञान``(ICT) या विषयाचा अनिवार्य विषय गटात नव्याने समावेश करण्यात आला आहे.  या विषयाची अंमलबजावणी इ.9 वीसाठी जून 2012 पासून व इ.10 वी 2013 पासून करण्यात येणार आहे. '' माहिती संप्रेषण तंत्रज्ञान '' या विषयाचा अभ्यासक्रम 50 गुणांचा असून लेखी परीक्षा 40 गुणांची, दोन तास कालावधीची व प्रात्याक्षिक परीक्षा 10 गुणांची , एक तास कालावधीची असेल.
       '' माहिती संप्रेषण तंत्रज्ञान '' या विषयाची 10 वी ची लेखी परीक्षा मंडळामार्फत घेण्यात येणार असून प्रात्याक्षिक परीक्षा विज्ञान विषयाच्या प्रात्याक्षिक परीक्षेप्रमाणे मंडळाच्या सुचनेनुसार शालेय स्तरावर घेण्यात येऊन मंडळास गुण पाठविण्यात येणार आहेत. मात्र या विषयाचे गुण गुणपत्रिकेत एकूण गुणात समाविष्ट न करता गुणपत्रिकेत श्रेणी दर्शविण्यात येईल.
           या विषयासाठी प्रात्यक्षिक व थेअरीसाठी एकत्रित आठवड्यात दोन तासिका राहतील. या विषयासाठी नव्याने स्वतंत्र शिक्षक नियुक्त न करता प्रचलित व माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनी या विषयाच्या तासिका घ्यावयाच्या आहेत.
          शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी मंडळाच्या सध्याच्या ऑनलाईन परीक्षेच्या प्रयोगशाळांचा आणि प्रयोग शाळांशीसंलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचा उपयोग करण्यात येईल. या विषयाच्या परीक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी राहील.            
          या विषयाची अमंलबजावणी जून 2012 पासून होत असल्याने त्या अनुषंगाने शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्याची कार्यवाही लवकरच मंडळामार्फत सुरु करण्यात येत आहे, असे सचिव महाराष्ट्र राज्य  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,  पुणे यांनी कळविले आहे.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा