शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

इंदु मिल व सीमाप्रश्नी राज्याचे शिष्टमंडळ आज नवी दिल्लीत पंतप्रधानाना भेटणार


मुंबई, दि. 29 : इंदु मिल सीमाप्रश्नी राज्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उद्या शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता नवी दिल्लीत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील महत्वाच्या नेत्यांचा समावेश असेल.
          मुंबईतील दादर येथील इंदु मिलची जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहे. या मिलची सर्व साडेबारा एकर जागा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला द्यावी, असा ठराव राज्य विधिमंडळाने केला आहे. याठिकाणी डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे. ही मागणी पंतप्रधान यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे.
          गेली 40 हून अधिक वर्षे बेळगावचा सीमाप्रश्न भिजत पडला असताना कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांचे वर्चस्व असलेली बेळगाव महानगरपालिका अन्यायकारकपणे आणि भाषिक द्वेषातून बरखास्त केली आहे. या महानगरपालिकेची पुनर्स्थापना करावी आणि जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणीही राज्य विधिमंडळात ठरावाद्वारे करण्यात आली आहे. ही मागणीही पंतप्रधानांकडे आग्रहाने मांडण्यात येणार आहे. 
          या दोन्ही प्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर येथे अलिकडेच केली होती.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा