मुंबई दि. 26 : राज्याने गेल्या
50 वर्षात चौफेर प्रगती केली असून आर्थिक विकास, सामाजिक व राजकीय सुधारणा यात
महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर राहिला आहे. देशाच्या सकल विकास उत्पन्नात
राज्याचे 50 टक्के योगदान आहे. उद्योग क्षेत्रातही राज्यात देशांतर्गत आणि परकीय
गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी आज
प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात केले.
प्रजासत्ताक
दिनाचा 62 वा वर्धापन दिन सोहळा आज शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता.
सकाळी सव्वा नऊ वाजता राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधान
परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजशिष्टाचार
मंत्री सुरेश शेट्टी, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, महापौर श्रद्धा जाधव,
मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, पोलीस
महासंचालक के. सुब्रम्हण्यम्, पोलिस आयुक्त अरुप पटनाईक आदींसह लोकप्रतिनिधी,
विविध देशांचे राजदूत, लष्करी दल, पोलीस विभाग आणि अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी
उपस्थित होते.
राज्यातील
जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात राज्यपाल म्हणाले की, लोकशाही चौकटीत राहूनही
भारतासारखा विकसनशील देश आर्थिक महासत्ता बनू शकतो, हे आपण दाखवून दिले आहे.
राज्याच्या सर्वेकष विकासासाठी लोकशाहीची ही वीण अधिक मजबूत करण्याची गरज आहे.
सामाजिक
आणि भौतिक सुविधा तसेच प्रशासन सुधारण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना आखल्या असून
सर्वस्तरावर प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे प्रशासनात
सुधारणा होण्याबरोबरच जबाबदारी आणि पारदर्शकता येईल व याचे लाभ समाजातील शेवटच्या
घटकांपर्यंत पोहचविले जातील, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राने 12 व्या पंचवार्षिक योजनेत महत्त्वाकांक्षी
उद्दिष्ट्ये ठेवली आहेत. राज्याचे सकल विकास उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट्य 11 टक्के
प्रस्तावित आहे. ही उद्दिष्ट्ये राज्य नक्कीच साध्य करेल, असा विश्वासही त्यांनी
व्यक्त केला.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य
शासनाने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली असून दहशतवादाच्या आव्हानाला सामोरे
जाण्यासाठी शासनाने पोलीस दलाला अत्याधुनिक शस्त्रे दिली आहेत. मात्र पोलीस
यंत्रणेच्या या प्रयत्नांना जनतेच्या सहकार्याबरोबरच जनतेने जागरुकता दाखविणे
देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यपाल
म्हणाले की, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची
प्रक्रिया राज्यात सध्या सुरु आहे. या लोकशाही प्रक्रियेतून स्थानिक स्वराज्य
संस्थावरील विश्वास आणि बांधिलकी व्यक्त होते. जनतेने शांततापूर्ण मार्गाने आपला
मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मूल्यांची जोपासना करावी, असे आवाहनही त्यांनी
यावेळी केले.
राज्यपाल
यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी वाचून
दाखविला.
यावेळी
झालेल्या संचलनात भारतीय नौदल, राज्य राखीव पोलीस
बल क्रमांक- 8, राज्य राखीव पोलीस बल क्रमांक- 11, मुंबई सशस्त्र पोलीस दल,
मुंबई दंगल नियंत्रण पथक, मुंबई रेल्वे पोलीस दल,
बृहन्मुंबई महिला पोलीस दल, सशस्त्र होमगार्ड
(पुरुष/महिला), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल,
राज्य उत्पादन शुल्क, नागरी संरक्षण दल
(पुरुष/महिला), मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई
महानगरपालिका सुरक्षा दल, सी.कॅडेट कोअर (मुले/मुली), आर. एस. पी. (मुले/मुली),
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळ आणि सार्वजनिक आरोग्य विभाग (चित्ररथ) तसेच कोळी
नृत्य, नाशिक जिल्ह्याचे सोंगी मुखवटे नृत्य, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नृत्य
आणि लावणी आदी पथकांनी भाग घेतला.
बृहन्मुंबई
वाहतूक पोलीस विभागाचे 40 मोटर सायकल पथक, नौदलाचे जमिनीवरुन हवेत तसेच जमिनीवरुन
जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र, पोलीस दलाची आर.आय.व्ही.वाहन, रक्षक वाहन,
मार्क्समॅन वाहन, महारक्षक वाहन, नागरी संरक्षण दलाची रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहन, सेंट जॉन ॲम्बुलन्सची
रुग्णवाहिका तसेच मुंबई अग्निशमन दलाचे रेस्क्यु वाहन व फिरत्या मंचकाची शिडी
यांनी देखिल यावेळी झालेल्या संचलनात भाग घेतला.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा