बुधवार, ४ जानेवारी, २०१२

कामगार व्यवस्थापन प्रणाली ''आधार'' शी संलग्न करावी - मुख्यमंत्री


मुंबई, दि.3 : राज्यातील असंघटीत आणि संघटीत कामगारांची ऑनलाईन माहिती संकलीत करुन त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी विकसीत करण्यात आलेली 'महाश्रम' कामगार व्यवस्थापन प्रणाली ही 'आधार' योजनेशी संलग्न करुन ती अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
          येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज या प्रणालीच्या राज्यस्तरावरील वापराचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, कामगार विभागाच्या प्रधान सचिव डॉ. कविता गुप्ता, कामगार आयुक्त संजय देशमुख, ग्लोडाईन टेक्नोसर्व्ह संस्थेचे अध्यक्ष आनंद सरनाईक यांच्यासह विविध कामगार संघटना, मालक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
          मुख्यमंत्री म्हणाले की, कामगार व्यवस्थापन प्रणाली ठाणे जिल्ह्यात  प्रायोगिक तत्वावर राबवून याद्वारे साधारण 2 लाख कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.  आता राज्यातील साधारण दीड कोटी असंघटीत आणि 50 लाख संघटीत कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्याचा कामगार विभागाचा मानस आहे.  पण फक्त प्रणाली विकसीत करुन न थांबता त्याची सातत्याने प्रयत्नपूर्वक अंमलबजावणी करणे, वेळच्यावेळी माहिती अपडेट करणे आणि त्याबरोबरच ऑनलाईन नोंदणी कार्यक्रमाचा सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. असे झाले तरच हा कार्यक्रम यशस्वी होईल आणि इतर राज्ये आणि काही विकसनशील देशांसाठी तो आदर्शवत ठरु शकेल, असे मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.  ही प्रणाली 'आधार' सोबतच केंद्र शासनाच्या कौशल्य विकास मोहिमेशीही जोडणे गरजेचे आहे,  असे ते म्हणाले.
          या प्रणालीद्वारे राज्यातील जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी झाल्यास ती एक खूप मोठी क्रांती ठरु शकेल ; शिवाय या माध्यमातून असंघटीत कामगारांसाठी एक सामाजिक सुरक्षा जाल निर्माण होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांनी व्यक्त केला.
        कामगार मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, कामगार विभागाचा कारभार जास्तीत जास्त   ऑनलाईन करण्याचा प्रयत्न आहे.  यामुळे विशेष करुन असंघटीत कामगारांना विविध योजनांचे लाभ मिळवून देणे तसेच कारभारात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणणे शक्य होणार आहे.  कामगार हा नेहमीच उपेक्षीत राहीलेला घटक आहे.  वाढत्या विकास दरात नेहमीच कामगारांच्या घामाचे योगदान असते, असेही  श्री.मुश्रीफ यांनी यावेळी नमुद केले.
          यावेळी मुख्य सचिव श्री.गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले.  प्रधान सचिव श्रीमती गुप्ता यांनी कामगार व्यवस्थापन प्रणालीबाबत सादरीकरण केले.
मुख्यमंत्र्यांचा 'आयटी' बाणा
          मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अभ्यासक आणि तज्ज्ञ व्यक्ती म्हणूनच सर्वपरिचित आहेत.  विविध शासकीय कार्यक्रम, योजना आणि प्रशासनामध्येही आयटीचा जास्तीत जास्त वापर व्हावा असा त्यांचा नेहमी आग्रह असतो.  आजच्या कार्यक्रमातही याची पुन: प्रचिती आली.  कामगार विभागामार्फत आज राज्यभरात वापरण्यासाठी सुरु करण्यात आलेली कामगार व्यवस्थापन प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी कोणकोणती आयटी तंत्रे वापरावीत याच्या अनेक क्लृप्त्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.  मोबाईल, संगणक, इंटरनेट, छायाचित्रिकरण, दूरचित्रवाणी, चित्रपट अशा सगळ्या सुविधा आता एकाच यंत्रात दिल्या जात आहेत.  आयटीच्या भाषेत याला 'कन्हर्जन्स'  असे म्हणतात.  शासकीय योजना ऑनलाईन पध्दतीने राबविताना त्यांचेही 'आधार' प्रणाली द्वारे 'कन्व्हर्जन 'करता येईल असे ते म्हणाले.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा