बुधवार, ४ जानेवारी, २०१२

विशेष अपिल निर्गत कार्यक्रम प्रलंबित अपिलांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी सर्वांचा सक्रीय सहभाग आवश्यक - विजय कुवळेकर


        मुंबई, दि. 3 : राज्य माहिती आयोगाकडील अपिलांचे वाढते प्रमाण लक्षात घेता दीर्घकाळ प्रलंबित असलेली अपिले निकाली काढण्यासाठी हा विशेष अपिल निर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून अपिलकर्ता, जनमाहिती अधिकारी व अपिल प्राधिकारी यांच्यात एकत्रित विचार विनिमयातून संवाद घडवून अपिले निकाली काढण्याचा उद्देश असून सर्वांचा सक्रीय सहभाग व सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्य माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांनी आज येथे केले.
          पोद्दार महाविद्यालयात आयो‍जित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नागपूरचे माहिती आयुक्त भास्कर पाटील, औरंगाबादचे माहिती आयुक्त दि. बा. देशपांडे, नाशिकचे माहिती आयुक्त श्री. शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
          दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अपिलांचा जलदगतीने निपटारा करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून श्री. कुवळेकर म्हणाले की, अद्यापपर्यंत 19 हजार अपिले व 4 हजार तक्रारी प्रलंबित आहेत तसेच दरमहा 2,200 ते 2,500 अपिले दाखल होतात.  नागरिकांना तत्परतेने माहिती मिळण्यासाठी आयोगाकडे अपिल दाखल झाल्यापासून 4 महिन्यांत त्याचा निर्णय लागावा यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. त्यामुळे सर्व घटकांचे सहकार्य यात अपेक्षित आहे. अनेक राज्यांनीही याबाबत उत्सुकता दर्शविली असून त्याची माहितीही मागविली आहे.
          यावेळी राज्यपाल के.शंकरनारायणन यांचा संदेश वाचून दाखविला. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात  साधारणत: 600 अपिलांवर सहकार्याने निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा