शनिवार, ३ मार्च, २०१२

कोलकत्ता सरस मेळा 2012 मध्ये महाराष्ट्राला उत्कृष्ट कामगिरीचा तिसरा पुरस्कार


मुंबई दि. 2 :  कोलकत्ता सरस मेळा 2012 मध्ये महाराष्ट्र राज्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिसरा पुरस्कार मिळाला असून  राज्याचे समन्वयक विलास शिंदे यांनी  हा पुरस्कार पश्चिम बंगालचे ग्रामविकास मंत्री   सुब्रतो मुखोपाध्याय यांच्या हस्ते नुकताच स्वीकारला.
पंचायत व ग्रामविकास विभाग पश्चिम बंगाल व ग्रामीण विकास विभाग, केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने कोलकत्ता येथे दि. 10 ते 20 फेब्रुवारी 2012 या दरम्यान सातव्या सरस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार देण्यात आला.
या मेळाव्यात महाराष्ट्रासह देशातील 18 राज्य सहभागी झाले होते. मुंबई महालक्ष्मी सरस या प्रदर्शनात महाराष्ट्रातील सहभागी झालेल्या 350 पेक्षा अधिक बचतगटांमधून निवडक 15 बचतगटांच्या 32 स्वरोजगारींचा सहभाग या प्रदर्शनात करण्यात आला होता. रायगडच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (उद्योग) विलास शिंदे यांना प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून पाठविण्यात आले होते.
या प्रदर्शनात ठेवण्यासाठी 16 लाख रुपये किंमतीच्या वस्तु विक्रीसाठी नेण्यात आल्या होत्या त्यापैकी 12.26 लाख रुपये इतक्या किंमतीच्या वस्तुंची विक्री झाल्याची माहिती ग्रामविकास विभागाचे सचिव सुधीर ठाकरे यांनी यावेळी दिली.  प्रदर्शनात हुपरी (कोल्हापूर) येथील व्हाईट मेटलपासून बनविलेले दागिने, तलासरी येथील वारली पेंटींग्ज्, अलिबाग येथील तांब्याच्या धातूवरील नक्षीकाम असलेल्या वस्तु, भंडारा येथील कोसा सिल्क साडी,  नाशिक येथील बेदाणे, सोलापूर चादरी, जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव येथील शुद्ध गायीचे तुप इ. उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांचा आर्थिक, सामाजिक विकास व्हावा या उद्देशाने 20 कलमी कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने सुरु केलेल्या स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी देशभर सरस प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.
महालक्ष्मी सरस मध्ये 5.15 कोटी रुपयांच्या वस्तुंची विक्री
नुकतेच 19 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2012  या कालावधीत मुंबई महालक्ष्मी सरस या बचतगटांच्या वस्तुंचे विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये देशातील 22 राज्यांनी सहभाग घेतला होता. 750 पेक्षा अधिक बचतगटातील 1617 स्वरोजगारींनी आपापली उत्पादने या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवली होती. त्यासाठी त्यांना 560 स्टॉल उपलब्ध करून दिले   होते.  या प्रदर्शनात 5 कोटी 15 लाख रुपये किंमतीच्या वस्तुंची विक्रमी विक्री झाली.
0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा